२१ मजल्यांपेक्षा अधिक उंचीवर पोहोचणार ‘अग्निशमन’ची शिडी; गगनचुंबी इमारतींमुळे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:01 IST2025-01-11T13:59:31+5:302025-01-11T14:01:51+5:30

६४ मीटरच्या चार ‘टर्न टेबल लॅडर’द्वारे आग विझवणे शक्य

Fire ladders will reach heights of more than 21 floors; Decision due to skyscrapers | २१ मजल्यांपेक्षा अधिक उंचीवर पोहोचणार ‘अग्निशमन’ची शिडी; गगनचुंबी इमारतींमुळे निर्णय

२१ मजल्यांपेक्षा अधिक उंचीवर पोहोचणार ‘अग्निशमन’ची शिडी; गगनचुंबी इमारतींमुळे निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गगनचुंबी इमारतींमध्ये आगीसारख्या दुर्घटनेवेळी बचाव कार्य करणे शक्य व्हावे, यासाठी अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६४ मीटर म्हणजेच २१ मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या चार टर्न टेबल लॅडर (वाहनासह शिडी) खरेदी करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या ताफ्यात जर्मन बनावटीच्या दोन टर्न टेबल लॅडर असून, त्याद्वारे एकावेळी १६ नागरिकांची सुटका करता येते.

देशातील अन्य पालिकांच्या तुलनेत मुंबई पालिकेचे अग्निशमन दल अत्याधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञानाने सज्ज आहे. अग्निशमन दलात डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणाली, आग विझविण्यासाठी रोबो, तसेच ९० मीटरपर्यंत उंचीचे टर्न लॅडर (हायड्रोलिक प्लॅटफॉर्म), आर्टिक्युलेटेड वॉटर टॉवर हॅजमेट, अतिशीघ्र प्रतिसाद वाहने आणि श्वसन मास्क, जलद आग विझविण्याची प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक ऑटोमेटेड लॅडर आणि दोन टर्न टेबल लॅडर आहेत.

आराखडा, बांधणी आणि देखभाल

  • टर्न टेबल लॅडरमुळे २१ व्या मजल्यापेक्षा अधिक उंचीवर या वाहनावरून लिफ्टच्या साहाय्याने पोहोचणे शक्य आहे.
  • जुन्या शिड्यांपेक्षा नवीन शिडी वाहनावर बसवण्याचा वेळ पाच ते सात मिनिटांनी कमी होणार आहे. 
  • या निविदेच्या माध्यमातून टर्न टेबल लॅडरचा आराखडा, बांधणी आणि सोबत पाच वर्षांचा देखभाल करार करण्यात येणार आहे. 


टर्न टेबल लॅडरची वैशिष्ट्ये

  • स्ट्रेचर व व्हीलचेअर ठेवता येते.
  • लॅडरमध्ये आधुनिक पद्धतीची लिफ्ट.
  • क्रेन म्हणूनही वापर करणे शक्य.
  • या लॅडरचा वापर लाइट टॉवर म्हणून करता येतो.
  • अपुऱ्या प्रकाशाच्या ठिकाणी लॅडरवरील एलईडी दिवे उपयुक्त.


यंत्रणेला गती मिळणार

अग्निशमन दलातील पारंपरिक लॅडर २०० किलोची असून ती उचलण्यासाठी चार जवानांची गरज असते. त्यामुळे दरवेळी लॅडरची हलवाहलव करणे अवघड जाते. याआधी नव्याने दाखल झालेल्या लॅडर वाहनामध्ये अग्निशमन व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या दोन्ही सुविधा जलदगतीने देण्याची यंत्रणा आहे. तसेच ही लॅडर बसविणे सोपे आहे. याच धर्तीवर नवीन लॅडर घेण्यात येणार आहे. 

Web Title: Fire ladders will reach heights of more than 21 floors; Decision due to skyscrapers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.