मानखुर्द येथील आगीत सात गाळे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:07 AM2021-09-18T04:07:25+5:302021-09-18T04:07:25+5:30
मुंबई मानखुर्द मंडाला येथील भंगाराच्या सात गाळ्यांना शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच ...
मुंबई
मानखुर्द मंडाला येथील भंगाराच्या सात गाळ्यांना शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेगाने आग विझविण्याचे काम हाती घेतले. दाटीवाटीचा परिसर आणि भंगार साहित्यामुळे आग विझविण्यात अडथळे येत होते. सदरची आग सकाळी ७ वाजता चारही बाजूंनी कव्हर करण्यात आली. मात्र, आग पूर्णतः विझविण्यासाठी सकाळचे नऊ वाजले होते.
आगीत इलेक्ट्रिक साहित्य, भंगार साहित्य आणि फर्निचर जळून खाक झाले. आगीचे स्वरूप एवढे रौद्ररूप होते की दुरूनही या आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसत होते. मानखुर्द येथील भंगारच्या दुकानांना आगी लागण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वीदेखील येथे दोन ते तीन वेळा आगी लागल्या होत्या. आजच्या आगीत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याठिकाणच्या आगीस तेल आणि भूमाफिया कारणीभूत असल्याचे म्हणणे सातत्याने मांडले जाते. अशा प्रकारच्या रहिवासी क्षेत्रात मुंबई महापालिका तेलावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना परवानगी देतेच कशी? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगारची गोदामे आहेत. शिवाय लगतच डम्पिंग ग्राउंडदेखील आहे. यापूर्वी डम्पिंग ग्राउंडला मोठ्या प्रमाणावर आगी लागल्या असून भंगारच्या गोदामांनाही आगी लागल्या आहेत.