कुलाब्यात ‘मेट्रो’ हाउसला भीषण आग
By admin | Published: June 3, 2016 03:11 AM2016-06-03T03:11:06+5:302016-06-03T03:11:06+5:30
दक्षिण मुंबईतील गजबलेल्या कुलाबा कॉजवे येथील रिगल चित्रपटगृृहानजीकच्या मेट्रो हाउसमध्ये गुरुवारी संध्याकाळी आग लागली. लाकडी जिने व छतावरील डांबरामुळे ही आग वेगात पसरली
मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबलेल्या कुलाबा कॉजवे येथील रिगल चित्रपटगृृहानजीकच्या मेट्रो हाउसमध्ये गुरुवारी संध्याकाळी आग लागली. लाकडी जिने व छतावरील डांबरामुळे ही आग वेगात पसरली आणि बाजूच्या इमारतीलाही तिने वेढले़ नौदलाच्या मदतीने चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळेही ही दुर्घटना घडल्याची शक्यता अग्निशमन दलातील सूत्रांकडून वर्तविण्यात आली.
मेट्रो हाउस या इमारतीमध्ये सायंकाळी चारच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील व्हिन्स गेस्ट हाउसमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे वातानुकूल यंत्राने पेट घेतला़ नंतर सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. जवळजवळ असलेल्या इमारती, चिंचोळे रस्ते, लाकडी जिने व फर्निचरमुळे आग वाढतच गेली़ आगीचे १८ बंब व पाण्याचे ११ टँकर घटनास्थळी होत्या़ आसपासच्या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले़ तीन तासांनंतरही आग आटोक्यात न आल्याने, अखेर नौदलास पाचारण करण्यात आले़