मुंबई : विकासकांच्या फायद्यासाठीच आरे कॉलनी परिसरातील डोंगराला आगी लावल्या जात आहेत. विकासक संदीप रहेजा आणि त्यांचे सहकारी एम.डी. चांदे यांच्या फायद्यासाठी हे प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. त्यामुळे या विकासकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही मनसेने केली आहे.राजगड या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांनी आरेआगीच्या सखोल चौकशीची मागणी केली. विकासकांचे प्रकल्प पुढे रेटण्यासाठीच आरे परिसरात आगी लावल्या जात आहेत. मंत्रालय आणि महापालिकेतील संबंधित विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली.आरे कॉलनीतील डोंगराला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. अग्निशमन दलाने याबाबत सादर केलेल्या अहवालात ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईतील हरित पट्टा गिळंकृत करून त्यावर बांधकाम करू पाहणाºया विकासकांचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. विकासकांना या परिसरात एकही वीट रचू देणार नसल्याचा इशाराही मनसेने दिला.
आरे आगीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत - मनसे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 1:03 AM