Video : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 04:28 PM2019-07-22T16:28:54+5:302019-07-22T16:29:47+5:30
जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबई - कालच कुलाबा येथील चर्चिल चेंबर इमारतीला आग लागली असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. मुंबईत दिवसेंदिवस आगीच्या घटना वाढत असून आज देखील वांद्रे पश्चिमेकडील एस व्ही रोडवरील एमटीएनएल इमारतीला आग लागली आहे. ही घटना आज दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास लागली घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझविण्याचे आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीमुळे एमटीएनएल इमारतीच्या गच्चीवर जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल
ही एमटीएनएलची इमारत ९ मजली असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. मात्र, आगीचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला असून घाबरलेले कर्मचारी जीव मुठीत घेऊन वाचविण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले. त्यामुळे जवळपास इमारतीच्या गच्चीवर १०० जण अडकल्याची शक्यता असून अग्निशमन दलाचे जवान त्यांना सुखरूप बाहेर काढत आहेत. अडकलेले काही कर्मचारी तोंडाला रुमाल बांधून आगीच्या धुरापासून बचाव करत आहेत. तर काही खिडकीजवळ येऊन वाचवा वाचवा अशा हाका मारत आहेत. शिडीच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान अडकलेल्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अडकलेल्यांपैकी६० लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुदैवाने अद्याप कोणीही जखमी नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
वांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएलच्या ९ मजली इमारतीला लागली आग https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2019