मुंबईतील करी रोड रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या वन अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीला आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली आहे. इमारतीच्या १९ व्या मजल्यावरील फ्लॅटला ही आग लागली होती असून ती हळूहळू वाढत गेली. १९ व्या मजल्यावर आग लागल्याचं कळताच सुरक्षारक्षक अरुण तिवारी (३०) हा १९ व्या मजल्यावर पोहोचला. त्यानंतर त्याला समजलं की तो अडकला आहे आणि स्वतःला आगीपासून वाचवण्यासाठी तो फ्लॅटच्या बाल्कनीत लटकत राहिला. बाल्कनीनजीक देखील आग लागली होती. सुरक्षारक्षक मृत्यूच्याआधी काही मिनिटे बाल्कनीच्या रेलिंगला लटकत राहिला” असं अधिकारी म्हणाले.
वन अविघ्न पार्कमधील १९ व्या मजल्यावर भीषण आग लागली. ही आग हळूहळू वाढत गेली. तिनं आणखी काही मजले कवेत घेतले. १९ व्या मजल्यावर आग पाहून आलेल्या सुरक्षारक्षकाने आपला जीव वाचवण्यासाठी बाल्कनीमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो सुरक्षा रक्षक खाली कोसळला. अरुण तिवारी या सुरक्षा रक्षकाला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं अशी माहिती केईएमच्या उपाधिष्ठाता प्रवीण बांगर यांनी माहिती दिली. तसेच याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद मुळे यांनी माहिती दिली.
या आगीप्रकरणी रहिवाशांनी केलेल्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात आली असून तथ्य आढळल्यास जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. आगीच्या घटनेची संपूर्ण प्रशासकीय चौकशी करण्यात येईल. तसेच तक्रारीची पडताळणी करुन त्यात तथ्य आढळले तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.