मुंबई - मुंबईतील करी रोड येथे असलेल्या वन अविघ्न पार्क या ६० मजली बिल्डिंगला आग लागली आहे. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थली दाखल झाले असून, इमारतीमध्ये बचावकार्य सुरू झाले आहे. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाली होती, तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. अरुण तिवारी असे या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. करी रोड येथील माधव पालव मार्गावर वन अविघ्न पार्क ही ६० मजली इमारत आहे. या इमारतीमधील १९ व्या मजल्याला ही आग लागली आहे. सकाळी ११.५१ च्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची भीषणता पाहून लेव्हल ३ ची आग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र आगीचे गांभीर्य वाढल्याने ही आग लेव्हल ४ ची असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. तसेच उंचावर वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आग भडकत असून, जीव वाचवण्यासाठी इमारतीलमधील रहिवासी आटापिटा करत आहेत.
दरम्यान, आगीचे वृ्त्त समजताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच त्यांनी मदतकार्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सुरुवात केली आहे. आगीची घटना घडल्यानंतर परिसरातील रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाला आहे. आगीमुळे इमारतीत अडकलेले अनेक रहिवासी जीव वाचवण्यासाठी आटापिटा करत आहेत. त्यातीलच एक व्यक्ती इमारतीवरून खाली पडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.