तेलाच्या टाकीची आग अद्याप धुमसतेय, स्थिती नियंत्रणाख़ाली; उष्णतेमुळे पुन्हा घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 05:49 AM2017-10-08T05:49:25+5:302017-10-08T05:49:43+5:30
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवाहर द्वीपावरील (बुचर आयलंड) तेलाच्या टाकीला लागलेली आग शनिवारी रात्रीपर्यंत विझली नसून, सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथे डिझेल व पेट्रोल घेऊ न जाणा-या सर्व जहाजांना तेथून हलविण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवाहर द्वीपावरील (बुचर आयलंड) तेलाच्या टाकीला लागलेली आग शनिवारी रात्रीपर्यंत विझली नसून, सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथे डिझेल व पेट्रोल घेऊ न जाणा-या सर्व जहाजांना तेथून हलविण्यात आले आहे. आग विझविण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अग्निशमन दलाबरोबरच मुंबई महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे जवानही कालपासून झटत आहेत.
मुंबईत काल संध्याकाळी गडगडाट व विजा चमकून प्रचंड पाऊस पडला.
त्या वेळी तेलाच्या एका टाकीला वीज पडून
आग लागली. ती ताबडतोब विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यात रात्री अग्निशमन जवानांना यशही आले होते. मात्र,
आगीच्या उष्णतेमुळे टाकीमध्ये कोंडलेल्या वाफेचा पुन्हा आज सकाळी स्फोट झाला आणि टाकीने पुन्हा पेट घेतला.
आगीचे लोळ अद्याप आकाशात
दिसत असले, तरी शेजारच्या टाक्यांना आगीपासून वाचविण्यात आले आहे. आग विझली नसली, तरी एकूण स्थिती नियंत्रणाखाली असल्याचे मुंबई अग्निशमन यंत्रणेचे प्रमुख पी. एस. रहांगडळे यांनी सांगितले.
जहाजांतून आलेले इंधन नेहमीच बुचर आयलंडवरील तेलांच्या टाक्यांमध्ये उतरविण्यात येते. तेथून समुद्राखालील स्वतंत्र पाइपलाइनने ते मुंबईत आणले जाते. इंधन असलेली जी जहाजे बुचर आयलंडपाशी पोहोचली होती, त्यांना पुन्हा समुद्रात पाठविण्यात आले असून, तिथे नांगर टाकून ती थांबविण्यात आली आहेत, तसेच जी जहाजे आज पोहोचणार होती, त्यांना ती जिथे आहेत, तिथेच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
चौकशीचे आदेश
ही आग वीज पडल्यानेच लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरी याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे भारत पेट्रोलियम कंपनीच्या सुरक्षा विभागाचे कार्यकारी संचालक मनोहर राव यांनी सांगितले.