मनोहर कुंभेजकर, मुंबई: दिवाळीच्या फटाक्यांची हौस आणि सोबतीला क्रिकेट म्हंटल्यावर किती फटाके फोडू आणि किती नको असं क्रिकेटप्रेमींना होते.पण आपली हौस पूर्ण करत असताना इतरांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो आणि तशी वेळ आलीच तर हे हौशी लोक गायब होतात. भाऊबीजेची संध्याकाळ आणि बरोबर भारतीय संघाने न्यूझीलंड संघावर मिळवलेला विजय साजरा करताना आणि लावलेल्या फटाक्याने दहिसर पूर्वेला वैशाली नगर येथे रुद्राक्ष बिल्डिंग मध्ये २२व्या मजल्यावर आग लागली. समोरच्या बिल्डिंगमधल्या नागरिकांनी आवाज देऊन सांगितलं तेव्हा घरातल्या लोकांच्या लक्षात आले.
योगेश आचरेकर आणि गिरीश चव्हाण या इमारतीत राहतात. ही घटना घडली गिरीशच्या वरच्या मजल्यावर (२२ वा मजला) आणि त्या घरातल्या रहिवाशांच्या आणि बिल्डिंगच्या सुदैवाने त्या क्षणी योगेश तिथे हजर होता. तो एका ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या बोटीवर काम करत असल्याने आगीवर नियंत्रण कसं मिळवावं याच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्याला वेळोवेळी मिळत असल्याचा फायदा झाला. त्यामुळेच योगेशने जीव धोक्यात घालत आणि पुढाकार घेऊन वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं आणि पुढे होणारी मोठी दुर्घटना टळली.
नंतर पोलीस आणि अग्निशामन दलाने येऊन पुढचं काम केल. पण योगेशने दाखवलेलं प्रसंगावधान आणि धैर्य खूपच कौतुकास्पद आहे.सण समारंभ जरूर साजरे करावेत पण आपल्या आनंदाचा इतरांना त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.योगेश आम्हाला तुझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.