दर सहा महिन्यांनी ‘फायर रिपोर्ट’ द्याच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:40 AM2018-06-15T05:40:44+5:302018-06-15T05:40:44+5:30
प्रभादेवी येथील आप्पासाहेब मराठे मार्गावरील तळमजला अधिक ३३ मजली ब्यू मॉन्ड या इमारतीच्या ३३व्या मजल्यावर बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीचा भडका मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही उडाला.
मुंबई : प्रभादेवी येथील आप्पासाहेब मराठे मार्गावरील तळमजला अधिक ३३ मजली ब्यू मॉन्ड या इमारतीच्या ३३व्या मजल्यावर बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीचा भडका मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही उडाला. मुंबईत टोलेजंग इमारती उभ्या राहत असून, एखादी टोलेजंग इमारत तीसपेक्षा अधिक मजल्यांची असेल तर तेथे वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. विशेषत: अग्निप्रतिबंधक उपाययोजना राबविण्याची जबाबदारी रहिवाशांची असून, सहा महिन्यांतून का होईना एकदा फायर आॅडिट रिपोर्ट अग्निशमन दलास रहिवाशांनी सादर केले पाहिजेत, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
प्रभादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत मुंबई अग्निशमन दलासह मुंबई महापालिकेचीही दमछाक झाली. येथील दुर्घटनाग्रस्त इमारत उंच असण्यासह उर्वरित घटकांमुळे आग शमविण्यात अग्निशमन दलासमोर अनेक अडथळे आले. दरम्यान, इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेमुळे आग शमविण्यास अग्निशमन दलास त्याची मदत झाली. मात्र मुंबई अग्निशमन दलाकडे नव्वद मीटर उंचीची शिडी असली तरी ती जास्तीतजास्त सत्तावीस मजल्यांपर्यंतच जाऊ शकते. अशावेळी इमारतीमधील अग्निशमन यंत्रणाच अग्निशमन दलाच्या मदतीला धावून येते. प्रभादेवी येथील आगीच्या घटनेनंतर स्थायी समितीच्या बैठकीत अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक साधने नसल्याचे नमूद करण्यात आले. तर प्रभादेवी येथील आग कशी लागली? दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये नियमांचे उल्लंघन झाले का? याबाबत अग्निशमन दल चौकशी करीत असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले.
‘त्या’ इमारतीपेक्षा आमची झोपडी बरी
पूर्व उपनगरातील माहुल येथील इमारतीमध्ये राहत असताना येथे यातना सहन करण्यापेक्षा आमची झोपडीच बरी. परिणामी आम्हास तेथेच नेऊन सोडा, अशी याचनाच येथील समस्यांनी त्रस्त झालेल्या रहिवाशांनी प्रशासनाकडे केली.
महत्त्वाचे म्हणजे येथे अनेक समस्या असून, येथील वातावरण आरोग्यास हानीकारक आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत सातत्याने चर्चा करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. परिणामी या प्रश्नी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीच सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीमध्ये केली.
तर हा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलाविण्यात यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनास दिले. महत्त्वाचे म्हणजे येथील रहिवाशांना कित्येक वर्षांपासून सुविधा मिळालेल्या नाहीत. इमारतीची वाईट अवस्था, शौचालयाची वाईट अवस्था, वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने पाणी येणे, मंडई उपलब्ध नसणे या समस्यांसह आरोग्याच्या समस्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.
मैदाने, उद्यानांचे परिरक्षण धोक्यात
महापालिकेच्या उद्यानांसह मैदानांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी मैदाने, उद्यानांचे परिरक्षण धोक्यात आले. यात कहर म्हणजे परिरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कंत्राटदारांनी घशात घातले आहेत, असा आरोप नगरसेवकांनी स्थायी समिती बैठकीत केला.
उद्यानात गर्दुल्ले आणि मद्यपींनी अड्डा केला असून, अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. येथे सुरक्षेचा अभाव असून, या सगळ्या समस्या लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिल्या.
३खुल्या मैदानावर व्यावसायिकांची नजर असून, अस्तित्वात असलेली मैदानेही नाहीशी होत आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. स्थानिकांकडून याबाबत अनेक तक्रारी केल्या जातात. परंतु कारवाई होत नाही, असेही म्हणणे लोकप्रतिनिधींनी मांडले.
दुसरीकडे अग्निशमन दलाकडे टोलेजंग इमारतीमध्ये आग लागल्यावर येथे बचाव करण्याबाबतची सुविधा नसेल तर ना हरकत प्रमाणपत्र का देता? टोलेजंग इमारतीच्या वरच्या मजल्यावरचे रहिवासीही कर देत असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही महापालिकेची आहे, असेही म्हणणे लोकप्रतिनिधींकडून स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आले.