मुंबई - मुंबईचा विकास होत आहे. अनेक टॉवर्स व इमारतीदेखिल उभ्या राहत आहे. पण, आग लागली, तर ती विझवायची कशी यांचे प्रशिक्षण देणारे अग्नी सुरक्षेचे प्राथमिक धडे नव्या शैक्षणिक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना देण्याचा विचार शासन करत आहे. तसेच त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्नही सुरू आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कांदिवली (पूर्व), प्रभाग क्रमांक २५, ठाकूर व्हिलेज येथील अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे पर्यावरण मंत्री तथा उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, अग्निशामक दलाच्या भूमिपूजनावरून काही लोक श्रेय घेण्याचे राजकारण करत आहेत. पण आम्ही मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करत आहोत. जनतेला सुरक्षा आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत. मुंबईच्या विकासासाठी शिवसेना व महाआघाडी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. यावेळी, राजकीय कार्यक्रम तर होतच राहणार. पण, कोरोना अद्याप संपलेला नाही. यामुळे सर्वानी मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक असल्याचेही आदित्य म्हणाले.
मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेत काही अग्निशमन केंद्र उभारण्यात येतील, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले. मागाठाणे येथील नागरिकांची अग्निशमन केंद्राची मागणी पूर्ण करण्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करणारे आमदार प्रकाश सुर्वे व नगरसेविका माधुरी भोईर यांचे आदित्य ठाकरे यांनी विशेष कौतुक केले. प्रभाग २५मध्ये विकास निधी आणि विविध समस्या निवारण करण्याचे आश्वासन त्यांनीही दिले.
यावेळी, आमदार विलास पोतनीस, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम,महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर, स्थानिक नगरसेविका माधुरी भोईर, माजी नगरसेवक योगेश भोईर, मुख्य अग्निशमन अधिकारी कैलास हिवराळे, पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, राज प्रकाश सुर्वे, अभिनेत्री उर्मिला कोठारे आदी उपस्थित होते.