विद्यार्थी गिरविणार अग्निसुरक्षेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:07 AM2020-12-31T04:07:13+5:302020-12-31T04:07:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने विविध कारणांमुळे आगी लागण्याच्या घटना घडत असतात. या घटना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने विविध कारणांमुळे आगी लागण्याच्या घटना घडत असतात. या घटना घडू नये म्हणून सातत्याने जनजागृती केली जाते. मात्र नागरिकांच्या निष्काळजीपणासह निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे आगीच्या घटन घडतात; आणि नाहक बळी जातात. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. याकरिता पालिकेच्या आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे धडे देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करता यावा म्हणून प्रयत्न केला जाणार आहे.
लालबाग येथील सिलिंडर स्फोटानंतर पुन्हा एकदा आगीचा प्रश्न समोर आला असून, मुंबईत ८० टक्के आगी या शॉर्टसर्किटमुळे लागत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत दिवसाला १५ आगीचे कॉल येत असून, दुर्दैव म्हणजे कार्यालयांसह घरातील वायरिंगचे ऑडिट होत नसल्याचे दुर्दैव आहे. वर्षनिहाय विचार करता सुमारे ४ हजार ५०० फायर कॉलची नोंद होत आहे. मुळात वीजव्यवस्थेनंतर किमान ५ वर्षांनी ऑडिट करणे गरजेचे असते. नियमित देखभाल करणे गरजेचे असते. मात्र घर असो, कार्यालय असो; असे सगळीकडे दुर्लक्ष होते आणि आगीच्या घटना घडतात. २००८ सालापासून २०१८ पर्यंत एकूण ५३ हजार ३३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. यात ६६६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४०४ पुरुष, २२३ महिला, ३४ मुले, ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २०१९ साली आगीच्या घटनात एकूण ५ हजार २५४ दुर्घटनेत एकूण ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यात २४ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश होता. २१६ जण जखमी झाले. त्यात १४२ पुरुष आणि ७४ महिलांचा समावेश होता.
यंदाच्या दिवाळीत फटक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ नोंदविण्यात येत असतानाच लक्ष्मीपूजनच्या दिवशी मुंबईत आगीच्या १५ घटना घडल्याचे कॉल मुंबई अग्निशमन दलास आले, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली. दरवर्षी अशा घटना घडण्याचे सरासरी हे प्रमाण १५० ते २०० आहे. यावेळी झालेल्या जनजागृतीसह मुंबई अग्निशमन दल वेगाने कार्यरत असल्याने अशा घटनांवर लवकर नियंत्रण मिळाले. शिवाय सुदैवाने अशा घटनाही कमी घडल्या; ही चांगली बाब आहे, असे दलाचे म्हणणे आहे.