लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचा विकास होत आहे. अनेक टॉवर्स व इमारतीदेखील उभ्या राहात आहेत. मात्र, जर आग लागली तर ती कशी विझवली पाहिजे, याचे प्राथमिक शिक्षण नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना देण्याचा शासन गांभीर्याने विचार करत असून, अभ्यासक्रमातून अग्नी सुरक्षेचे धडे देण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
कांदिवली पूर्व, प्रभाग क्रमांक २५ ठाकूर व्हिलेज येथील अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व शिवसेना उपनेते सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ठाकरे बोलत होते.
यावेळी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना अग्निशमक दलाच्या भूमिपूजनावरून काहीजण श्रेयवाद घेत आहेत. पण आम्ही मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करत आहोत. जनतेला सुरक्षा आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. मुंबईच्या विकासासाठी शिवसेना व महाआघाडी सरकार सातत्याने प्रयत्नशील असून, राजकीय कार्यक्रम हे तर होत राहणार. मात्र, अद्याप कोविड़ संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, मिडी व मोठी अग्निशमन केंद्र उभारण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. मागाठाणे येथील नागरिकांची अग्निशमन केंद्राची मागणी पूर्ण करण्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करणारे आमदार प्रकाश सुर्वे व नगरसेविका माधुरी भोईर यांचे आदित्य ठाकरे यांनी विशेष कौतुक केले. प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासनिधी देण्याबरोबरच येथील विविध समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिले.
--------------------------------------