Join us

मुंबईची अग्निसुरक्षा आता होणार बळकट; २३२ कोटींची तरतूद, महापालिका आयुक्तांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 11:41 AM

मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी पाच ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी पाच ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूझ, चेंबूर व अंधेरी येथे ही नवीन केंद्रे बांधण्यात येणार असून त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली.

२३२ कोटींची तरतूद-

अग्निशमन दलाची क्षमता व सुविधांच्या बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत ठाकूर व्हिलेज–कांदिवली (पूर्व), एल.बी.एस. मार्ग-कांजूरमार्ग (प.) या दोन्हीही ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्रे बांधण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. जुहू तारा रोड-सांताक्रुझ (प.), माहूल रोड-चेंबूर व टिळक नगर येथे नवीन अग्निशमन केंद्रे बांधण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या दर्जोन्नतीसाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विविध प्रकल्पांसाठी २३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मॉकड्रीलचे होते आयोजन-

१) अग्निशमन दलाच्या दर्जोन्नतीसाठी महापालिका विशेष प्रयत्न करीत असून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी अग्निशमन दलातर्फे विविध मॉल्स, अधिक रहदारीची ठिकाणे, चाळी आणि झोपडपट्टी, उत्तुंग इमारती व रुग्णालयांमध्ये वेळोवेळी मॉकड्रील आयोजित करण्यात येत आहे. 

२) उत्तुंग इमारतींमध्ये अग्निशमन व विमोचन कार्याकरिता ३० मी. उंचीचे शिडीचे वाहन व पाच मिनी वॉटर टेंडर अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहे. तर ४० मी. उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन लवकरच दाखल होणार असल्याची घोषणाही आयुक्तांनी केली.

आगीच्या घटनांमध्ये वाढ-

१) मुंबई नवीन उंच इमारती, जुन्या इमारती, गॅस गळती यासारख्या कारणांमुळे झोपडपट्ट्या आणि इमारतींना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांच्या वेळी जवळाच्या अग्निशमन केंद्राकडून मदत मिळते. 

२) आग मोठी असल्यास अन्य अग्निशमन केंद्राकडून मदत मिळवली जाते. या पार्श्वभूमीवर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाअग्निशमन दल