आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करता?कितीही मोठी आपत्कालीन घटना घडू द्या. अशा वेळी आमचा प्रतिसाद तत्काळ असेल तर कामाचा परिणाम दिसून येतो. एखादी आपत्कालीन घटना घडली आणि तेथे आम्ही वेळेत दाखल झालो तर परिणाम चांगला दिसून येतो. घटनेवर नियंत्रण लवकर मिळविता येते. मनुष्यहानी कमी होते. परिणामी आत्मविश्वास वाढतो. सर्वसामान्य माणसांना वाटते की अग्निशमन दलाची गाडी एकदम वेगाने दाखल झाली पाहिजे. गाडी वेगाने दाखल झाली म्हणजे आमचे काम नीट होत आहे, असे नाही. यासाठी आम्हाला खूप काम करावे लागते. आम्ही यासाठी एक कार्यक्रम तयार केला असून, सहा क्षेत्रांत म्हणजे सहा विषयांत काम करत आहोत. प्रथमत: आम्ही पायाभूत सेवा-सुविधा सुधारण्यावर भर दिला आहे. यात आम्ही दोन भाग केले; एक वर्तमान आणि भविष्य. यामधील दरी भरून काढण्यासाठी काय करता येईल, यावरही काम सुरू आहे.
अग्निशमन दलाचा विस्तार कसा करत आहात?गवालिया टँक येथे हायड्रोलिक प्लॅटफार्म तयार केले आहे. कोस्टल परिसरात बोटी तैनात केल्या. जेथे आम्हाला संधी आहे; त्या त्या अग्निशमन केंद्राचा विस्तार करण्यास आम्ही सुरुवात केली. आम्ही कुर्ल्याला मल्टिपल फायर स्टेशन करत आहोत. बीकेसीमध्ये मोठ्या भूखंडावर मोठे फायर स्टेशन बांधत आहोत. नवी अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी आम्ही काम करत आहोत. २६ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित केली आहेत. दहिसर येथे कांजरपाड्यातील अग्निशन केंद्र आता ताब्यात घेत आहोत. कांजूरमार्ग येथे अग्निशमन केंद्र उभारणार आहोत.
अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ आहे का?मनुष्यबळ वाढविणे ही सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. गेल्या काही काळात ७३९ लोकांना भरती केले. यात महिला आणि पुरुषांचा सहभाग आहे. त्यांना प्रशिक्षण द्यावे लागले. एकाच वेळी एवढ्या सगळ्या लोकांना प्रशिक्षण देता येत नाही. प्रशिक्षणासाठी दीड वर्ष लागले. अजून पाचशे लोकांची भरती करणार आहोत. गेल्या तीन वर्षांत फायरमनची संख्या वाढविली आहे. वडाळ्यात प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. भारतातील हे सगळ्यात मोठे केंद्र आहे. बचावकार्याचे तंत्र बदलत आहे. ते आम्ही आत्मसात करत आहोत. आम्ही प्रत्येक अग्निशमन केंद्रात जीम तयार केली आहे. लॉकर रूम अद्ययावत केले आहेत. कमांड आणि कंट्रोलवर काम करत आहोत. संवाद तंत्रज्ञानात अद्ययावत बदल करत आहोत. जीपीआरएसवर भर देत आहोत. डिजिटल कम्युनिकेशनला प्राधान्य देत आहोत.
फायर हायड्रंट बंद असल्याचा फटका बसतो का?हायड्रंट बंद आहेत. कारण ते ब्रिटिशकालीन आहेत. सोळाव्या शतकानंतर हे हायड्रंट उभारण्यात आले होते. आज वस्तुस्थिती बदलली आहे. आज पाण्याचा दाब यातून मिळणार नाही. फायर हायड्रंट सुरू असले तरी आम्हाला त्याचा फायदा होणार नाही. आज आमच्याकडे अठरा हजार लीटर पाण्याचे टँकर्स आहेत. वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरत आहोत. आज मुंबई शहरात २७ फिलिंग पॉइंट केले आहेत. आम्ही हायड्रंटवर अवलंबून नाही. आम्हाला अडचण येते ती वाहतूककोंडीची. आग लागल्यावर तेथे पोहोचेपर्यंत कोंडीचा सामना करावा लागतो. जेथे आग लागली असेल तेथे जवळच फिलिंग पॉइंट असेल यावर आम्ही काम करत आहोत. वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये जेथे आग लागली आहे; तेथेच पाणी मिळेल यावर काम करत आहोत.
बांधकामांच्या परीक्षणाबाबत काय सांगाल?जगाच्या पाठीवर असे कोणतेच अग्निशमन दल नाही जे प्रत्येक इमारतीमध्ये अग्निशमन दलाचा एक जवान ठेवू शकेल. आम्ही एका वर्षात चार हजारांहून अधिक इमारतींचे, तीन हजारांहून अधिक रेस्टॉरंटचे, सात हजारांहून अधिक बांधकामांचे परीक्षण केले आहे. आम्ही असे म्हणत नाही की ती त्यांची जबाबदारी आहे. जबाबदारी आमचीही आहे. पण प्रत्येक इमारत तपासणे शक्य नाही. आम्ही स्वयंसेवक उपक्रमांतर्गत सहा हजार स्वयंसेवक तयार केले आहेत. पूर्व, पश्चिम उपनगरासह शहरासाठी तीन व्हॅन तयार करत आहोत.
आगीचे प्रमाण वाढले आहे का?आगीचे प्रमाण कमी असले तरी मध्यम आणि मोठ्या आगीचे प्रमाण वाढले आहे. चेंबूरच्या आगी वेळी आमची गाडी तेथे पोहोचेपर्यंत वेळ गेला. तेवढ्या वेळात तेथे सिलिंडरचा स्फोट झाला. त्या वेळेत आम्ही तेथे पोहोचलो असतो तर सिलिंडर स्फोट झाला नसता. मनुष्यहानी झाली नसती. आमचा अर्धा वेळ वाहतूककोंडीत गेला. वेळेवर पोहोचता आले नाही तर लवकर आगीवर नियंत्रण मिळविता येत नाही. आपल्याकडे रस्ते लहान आहेत. पायाभूत सेवा-सुविधा कमी आहेत. आपली वाहतूक व्यवस्था भक्कम पाहिजे.
अग्निशमन प्रतिबंधित उपाययोजनेबाबत काय सांगाल?इमारतींमधील अग्निशमन प्रतिबंधित उपाययोजना व्यवस्थित असणे गरजेचे आहे. असे म्हटले जाते की फायर ब्लेम गेम खेळते. प्रत्यक्षात तसे नाही. आपल्याकडे सत्तर मीटर उंचीच्या इमारती आहेत. या सर्व इमारती जुन्या आहेत. येथील अग्निशमन यंत्रणा पुरेशी नाही. ही येथील आव्हाने आहेत. एसआरए इमारतीमध्ये तेच आहे. इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा असेल तर फायर फायटिंग व्यवस्थित करता येते. ते नसेल तर अडचणी येतात.
नॉन ओसी इमारतींबाबत काय म्हणणे आहे?नॉन ओसी इमारतीचा विचार करायचा झाला तर मी कोणाकडेही बोट दाखविणार नाही. येथे कसे होते की, विकासक आमच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतो. पण ना हरकत प्रमाणपत्र घेतले म्हणजे सगळे काही सुरळीत आहे, असे होत नाही. येथे इतर प्राधिकरणांचीही महत्त्वाची भूमिका आहे. ज्या इमारतींना ओसी नाही तेथे वीज आणि पाणी मिळते. लोक राहतात. ते अनधिकृत आहे. तेथे अग्निशमन दल काहीच करू शकत नाही. मी जर फायरची एनओसी दिली तर सगळे अग्निशमन दलावर येईल. आता ज्या मोठ्या इमारतींना आग लागली; त्यापैकी कोणत्याच इमारतींना ओसी नव्हती. अशा वेळी आमच्याकडे कितीही चांगली उपकरणे असली तरी आम्ही काहीच करू शकत नाही.
मेट्रोसह इतर बांधकामांचे अग्निशमन दलाच्या कामात अडथळे येतात का?मेट्रोच्या कामामुळे घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागतो. पण भविष्यासाठी मेट्रो आवश्यक आहे. परिणामी ही अडचण असली तरी आपण त्याकडे बोट दाखवून चालणार नाही. आग विझविणे म्हणजे फक्त हातामध्ये पाणी घेऊन पाणी मारणे नाही. प्रतिसाद चांगला आला पाहिजे तर तुमचे म्हणजे आमचे काम दिसते. पार्किंग हा मोठी समस्या आहे. परिणामी लोकांनी याचाही विचार केला पाहिजे.
गॅस सिलिंडरचा स्फोट आणि अनधिकृत साठ्याविषयी काय म्हणणे आहे?अनधिकृत गॅसचा साठा ही मोठी समस्या आहे. गॅस सिलिंडरची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कंपन्यांचीही काही तरी जबाबदारी आहे. आम्ही कारवाई करतो. कारवाई झाल्यानंतर परिस्थिती जैसे थे होते. जबाबदारी फक्त अग्निशमन दलाची नाही. प्रत्येक नागरिकाची आहे. जे मोठ्या इमारतींना लागू होते; तेच झोपड्यांनाही लागू होते. येथे गल्ल्या छोट्या आहेत. रस्ते छोटे आहेत. गॅस लिकेज होते तेव्हा लोकांनी काळजी घेतली पाहिजे. अशा वेळी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट काम केले जाते. गोदामांमध्ये असलेला साठा, याबाबत संबंधितांनी जागृत असले पाहिजे. झोपड्या म्हटले की धारावी डोळ्यासमोर येते. धारावी हेच एक गोदाम आहे. येथे मी पुन्हा एकच सांगतो की लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. आम्ही आता सतरा मिनी फायर इंजीन आणत आहोत.
काचेच्या इमारती, चौपाट्यांवरील सुरक्षेबाबत कसे काम सुरू आहे?पर्यटक मनोरंजनासाठी चौपाट्यांवर येतात. मात्र काळजी घेत नाहीत. खोल समुद्रात गेल्यावर दुर्घटना घडते. ८० टक्के लोकांचा मृत्यू हा बुडून होतो. खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केले जाते. लोक ऐकत नाहीत. लोकांचा सकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा आहे. मद्य प्राशन करून समुद्रात जाता कामा नये. चौपाट्यांवरील सुरक्षा कशी वाढवता येईल, बचावकार्य आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल यावर आमचा भर आहे. काचेच्या इमारतीबाबत बोलायचे झाल्यास इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा अपेक्षित आहे. हवा खेळती राहिली पाहिजे. वीज वाहून नेत असलेल्या यंत्रणा बंदिस्त असल्या पाहिजेत. त्या खुल्या असता कामा नयेत. वायर डक्ट बंद असले पाहिजे. शंभर टक्के इमारती तपासणे शक्य नाही. म्हणून मी असे म्हणतो की अग्निसुरक्षा ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे.(शब्दांकन : सचिन लुंगसे)