Join us

हायकोर्टाच्या तंबीनंतर अग्निसुरक्षा नियमावली जारी; अंतिम अधिसूचना जारी केल्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 9:45 AM

राज्यातील सर्व नियोजन प्राधिकरणे आणि महापालिका या नियमावलीचे पालन करतील, असे खंडपीठाने म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अग्निसुरक्षा नियमावली जारी करण्यास सरकारने अनेक वर्षे  विलंब केल्याने दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने मुंबईतील नव्या बांधकामांना परवानगी देण्याचे थांबवू, अशी तंबी सरकारला दिली होती. त्यानंतर शुक्रवारी, सरकारने  राज्यातील असुरक्षित इमारतींसाठी अग्निसुरक्षा नियम लागू करण्याकरिता अंतिम अधिसूचना जारी केल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. 

२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मानवनिर्मित आपत्तींच्या दृष्टीने असुरक्षित असलेल्या इमारतींसाठी १० ऑक्टोबरची अग्निसुरक्षा नियमावली आहे. शुक्रवारी अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाला सांगितले की, १० ऑक्टोबरला सरकारने दोन अधिसूचना काढल्या. मानवनिर्मित आपत्तींच्या दृष्टीने असुरक्षित असलेल्या मुंबई व उर्वरित राज्यांतील इमारतींना या अधिसूचना लागू होतील. त्या राजपत्रात प्रकाशित करा. राज्यातील सर्व नियोजन प्राधिकरणे आणि महापालिका या नियमावलीचे पालन करतील, असे खंडपीठाने म्हटले.

 

टॅग्स :मुंबई हायकोर्टराज्य सरकार