मुंबईतील ४० रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 02:22 AM2021-02-09T02:22:31+5:302021-02-09T02:22:44+5:30
रुग्णालयांना आवश्यक सुधारणा करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे, तर नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द होऊ शकते.
मुंबई : अग्निशमन दलाने मुंबईतील १,१४९ रुग्णालयांच्या घेतलेल्या झाडाझडतीत तब्बल ४० रुग्णालयांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या रुग्णालयांना आवश्यक सुधारणा करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे, तर नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द होऊ शकते.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या आगीच्या प्रकरणानंतर रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या महिन्यात अग्निशमन दलाने सर्व रुग्णालयांची नव्याने झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. महिनाभराच्या कालावधीत १,१४९ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३४२ ठिकाणी सर्व यंत्रणा नियमानुसार असल्याचे दिसून आले. तर १२८ रुग्णालये बंद होती. मात्र, ६३९ रुग्णालयांमध्ये काही किरकोळ दुरुस्त्या करण्याचे आवश्यक असल्याचे या तपासणीतून समोर आले. ४० रुग्णालयांच्या इमारतीबाहेर पडण्याच्या रस्त्यांमध्ये अडगळ, अग्निरोधक यंत्रणा बंद असणे आदी निष्काळजी आढळून आली. या रुग्णालयांना आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना करण्यात येणार आहे. हे बदल करणे त्यांना बंधनकारक आहे.
या नियमांचे उल्लंघन
मुंबईतील बहुतांश रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नाही, फायर एक्सटिंगुइशेरसारख्या अनेक गोष्टी नाहीत, आपत्तीकाळात बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे आहेत, अशा पद्धतीने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
दोन महिन्यांची मुदत
अग्निशमन दलाने केलेल्या फायर ऑडिटमध्ये ४० रुग्णालयांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यांना आवश्यक बदल करण्यास दोन महिन्यांची मुदत दिली जाणार आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त