अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर! २,७०० इमारतींना मिळाली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 09:48 IST2025-03-08T09:47:38+5:302025-03-08T09:48:05+5:30
अग्निशमन दलाकडून दाखल झाले ६४ गुन्हे; प्रमाणपत्र तातडीने घेण्याचे सोसायट्यांना निर्देश

अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर! २,७०० इमारतींना मिळाली नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंबईतील सुमारे २७०० गृह संकुलांना अग्निशमन दलाने तपासणीनंतर नोटीस बजावली आहे. यातील ६४ इमारतींवर कारवाई करत आता गुन्हे दाखल केल्याची माहिती अग्निशमन दलाचे उप अग्निशमन अधिकारी अनिल परब यांनी दिली आहे.
मुंबईतील उंच इमारती आणि रहिवासी गृह संकुलांमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा सुस्थितीत आणि कार्यान्वित असणे बंधनकारक आहे. रहिवासी इमारती आणि आस्थापनांना याबाबतचे प्रमाणपत्र (नमुना ब) मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर सादर करण्याचे निर्देश आहेत.
इमारतीत आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील अग्निशमन यंत्रणा उत्तम स्थितीत असल्याबाबत परवानाप्राप्त अभिकरणाकडून सहामाही प्रमाणपत्र (नमुना ब) वर्षातून २ वेळा म्हणजेच जानेवारी व जुलैमध्ये प्राप्त करून घ्यावे लागते. याकडे अनेक सोसायटी, आस्थापना दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतींना परवानाप्राप्त अभिकरणाकडून सहामाही प्रमाणपत्र (नमुना ब) वर्षातून २ वेळ म्हणजेच जानेवारी व जुलैमध्ये प्राप्त करून घ्यावे लागते.
काय होते कारवाई?
अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आल्यास १२० दिवसांत यंत्रणा कार्यरत करण्याची सूचना असते. त्यानंतरही पालन न केल्यास वीज पुरवठा खंडित करणे, पाणीकपात करणे, असे कारवाईचे प्रकार अमलात आणले जातात. यानंतर सोसायट्या किंवा आस्थापनांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात खेचले जाते.
अशी होते इमारतींमध्ये अग्निसुरक्षेची तपासणी
इमारतींमध्ये फायर एक्स्टिंग्विशर, फायर हायड्रेट, स्प्रिंकलर यंत्रणा योग्य स्थितीत आहेत की नाही, याची तपासणी केली जाते. या उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल आणि इमारतीत अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात आहेत की नाही, याची तपासणी अग्निशमन अधिकाऱ्यांकडून केली जाते.
जर नियम पाळले जात नसतील, तर अग्निशमन दलाकडून इमारत मालकांना नोटीस बजावली जाते आणि दलाकडून कायदेशीर कारवाई करून तसा तपासणी अहवाल महापालिकेकडे पाठवला जातो.
गेल्या वर्षभरात मुंबई आणि उपनगरातील हजारो इमारतींची अग्निशमन दलाकडून तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २७०० इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर दोषी आढळलेल्या ६४ इमारतींवर कारवाई करण्यात आल्याचे अग्निशमन अधिकारी अनिल परब यांनी सांगितले.