Join us

बोरीवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाचा जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:09 AM

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, शनिवारी सकाळी सातच्या सुमारास बोरीवली पश्चिमेकडील गांजावाला लेनवरील ...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, शनिवारी सकाळी सातच्या सुमारास बोरीवली पश्चिमेकडील गांजावाला लेनवरील गांजावाला रेसिडेन्सी बिल्डिंगच्या सातव्या माळ्यावरील सुरक्षा कार्यालयास आग लागल्याची घटना घडली. येथील आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवनांनी काही क्षणांतच आग शमविण्याचे काम हाती घेतले.

अग्निशमन दलाकडून सुरक्षेची खबरदारी म्हणून लगतचा परिसर रिकामा करण्यात आला होता. शिवाय लगतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूककोंडीदेखील झाली होती. इमारतीच्या सातव्या मजल्यावर लागलेली आग दुरूनही दिसत होती. रौद्र स्वरूपाची ही आग असल्याने स्थानिक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अग्निशमन दलाने सकाळी साडेनऊपर्यंत येथील आग नियंत्रणात आणली. मात्र येथील आग शमविताना अग्निशमन दलाचे जवान नथू सर्जेराव बढक हे आठ ते दहा टक्के भाजले. अग्निशमन दलाच्या जखमी जवानावर कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले, अशी माहिती डॉ. समिधा यांनी दिली.