हुक्क्यामुळेच पसरली आग - प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:27 AM2017-12-30T02:27:00+5:302017-12-30T02:27:12+5:30
मुंबई : दादरचा रहिवासी असणारा प्रतीक ठाकूर (२८) आपल्या पत्नी आणि दोन मेव्हण्यांसह आठ जण या अग्निकांडात अडकले होते.
मुंबई : दादरचा रहिवासी असणारा प्रतीक ठाकूर (२८) आपल्या पत्नी आणि दोन मेव्हण्यांसह आठ जण या अग्निकांडात अडकले होते. या दुर्घटनेतून ते सुखरूप बचावले. मात्र त्यांच्या सांगण्यानुसार ‘वन अबव्ह’ या रेस्टॉरंटमधील ९० टक्के आग हुक्क्यामुळेच पसरल्याचे सांगत होता. आम्ही छोट्याशा पार्टीसाठी या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, मात्र त्या अवघ्या काही मिनिटांत मृत्यू अनुभवल्याचा थरारक अनुभव आल्याचे प्रतीक सांगत होता.
रेस्टॉरंटमध्ये असताना साडेबाराच्या सुमारास सगळीकडे पार्ट्या रंगत होत्या, रेस्टॉरंटमधील सगळेच जण हुक्क्याचे सेवन करत होते. ही आग हुक्क्यामुळेच अधिक पसरल्याचे प्रतीकचे म्हणणे आहे. सुरुवातीला आग लागल्याचे कळताच सगळ्यांनी धावपळ सुरू केली, मात्र बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत असताना सुरक्षारक्षकाने अडविले. त्या वेळेस सुरक्षारक्षक ‘बाहेर पडू नका’ असे सांगत होता. प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात बाथरूममध्येही शिरलो पण तेथेही घुसमट होत असल्याचे लक्षात येताच ‘एक्झिट’कडे धाव घेतली. आणखी १५-२० मिनिटे तेथे थांबलो असतो तर आम्ही जिवंतच राहू शकलो नसतो, असे प्रतीक गहिवरून सांगत होता.
बाहेर येण्याचा मार्ग खूपच अरुंद असल्याने काहीच सुचत नव्हते. पण आगीतून कसेबसे बाहेर आलो. मात्र बाहेर आल्यावर पत्नी तोरल आतच अडकली असल्याचे वाटल्याने तिला शोधण्यासाठी पुन्हा आत जाण्याची तयारी केली होती.
मात्र त्याचवेळेस पत्नीचा भाऊ मयांक पारेख हासुद्धा बाहेर आला आणि त्याने तोरलही बाहेर सुखरूप बचावल्याचे सांगितले. बराच वेळ तोरल हिला सुरक्षारक्षक बाहेर पडून देत नव्हता़ त्या वेळी काहीशी शाब्दिक बाचाबाची झाली, मग बाहेर पडल्याचे तिने सांगितले.