Join us

पार्कमध्ये फायर स्टेशन महत्त्वाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 3:34 AM

प्रियदर्शनी पार्कमध्ये उभारण्यात आलेले फायर स्टेशन शोभिवंत वाटले नाही तरी अत्यावश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ‘मलबार हिल सिटीझन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रियदर्शनी पार्कमध्ये उभारण्यात आलेले फायर स्टेशन शोभिवंत वाटले नाही तरी अत्यावश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ‘मलबार हिल सिटीझन फोरम’ला याबाबत मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले.प्रियदर्शनी पार्कमध्येच फायर इंजिन ठेवण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला ‘मलबार हिल सिटीझन फोरम’ने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले.फायर इंजिनसाठी पार्कमधील झाडे कापण्यात आली तसेच पार्कचे प्रवेशद्वारही तोडण्यात आले आहे. त्यामुळे पार्क रात्रंदिवस सुरू राहील आणि काही लोक त्यामध्ये घुसून आश्रय घेतील आणि पार्कची दुरवस्था करतील, असे याचिकेत म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने याच परिसरात अन्य एखादा भूखंड मोकळा आहे का? अशी विचारणा महापालिकेकडे केली. त्यावर महापालिकेच्या वकिलाने नकारात्मक उत्तर दिले. ‘मलबार हिल, वाळकेश्वर आणि पेडर रोड या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास या फायर स्टेशनमुळे येथील नागरिकांना त्वरित वाचविणे शक्य आहे,’ असे महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयानेही याचिकाकर्त्यांना महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे चर्चा करण्याचे निर्देश दिले. ‘पार्कमध्ये फायर स्टेशन कदाचित शोभून दिसणार नाही. मात्र ते आवश्यक आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.- प्रियदर्शनी पार्क सुमारे ६५ हजार चौ. फुटांवर पसरले आहे. ही सर्व जागा ‘मलबार हिल सिटीझन फोरम’ला १९८५ मध्ये भाडेकरारावर देण्यात आली आहे.- मलबार हिल सिटीझन फोरम हा पार्कची देखभाल करत असून त्यांनी या ठिकाणी जॉगर्स पार्क, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, पार्कच्या एकूण जागेपैकी ४ हजार चौ. मी. जागा फायर स्टेशनसाठी राखीव ठेवली आहे.