नवी मुंबई : रबाळे रेल्वे स्थानकालगत भुयारी मार्गाला सोमवारी दुपारी आग लागली. त्यामध्ये या मार्गावरील फायबरचे छत पूर्णपणे जळाले. परिणामी काही वेळ तेथील वाहतूक ठप्प झाली.रबाळे रेल्वे स्थानकालगतच वाहनांसाठी असलेल्या भुयारी मार्गाला सोमवारी दुपारी २च्या सुमारास आग लागली. याची माहिती मिळताच वाशी व ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. लगतच्या गवताने पेट घेतल्याने आग लागल्याची शक्यता अग्निशमन अधिकारी प्रभाकर गाडे यांनी सांगितले. आगीमुळे फायबरच्या शेडने पेट घेतला आणि छत पूर्णपणे जळाले. पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा हा भुयारी मार्ग आहे. त्यामुळे वाहतूक लगेच थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वाशी रेल्वे पोलिसांनीही घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली. ही आग अधिक पसरली असती तर त्याचा परिणाम ठाणे-वाशी रेल्वे मार्गावर देखील होऊ शकला असता. रेल्वे रुळापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर ही आग लागली होती. तेथील मोकळ्या जागेतील गवताने पेट घेतला असता तर ही आग रेल्वे स्थानकापर्यंत देखील पसरली असती. मात्र अग्निशमन दलाच्या खबरदारीमुळे ही संभाव्य दुर्घटना टळली. (प्रतिनिधी)
रबाळे स्थानकाजवळ भुयारी मार्गाला आग
By admin | Published: February 10, 2015 12:29 AM