लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भांडूप पश्चिमेकडील तळमजला अधिक तीन मजले असलेल्या ड्रीम्स मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील सनराईज या रुग्णालयास गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला. निसार जावेद चंद ( ७४), मुणगेकर ( ६६ ), गोविंदलाल दास ( ८० ), मंजुळा बाथेरिया ( ६५ ), अंबांजी नारायण पाटील (६५), सुनंदाबाई अंबांजी पाटील (५८), सुधीर सखाराम लाड (६६), हरिष करमचंद सचदेव (६८), श्याम भक्तीलाल (७७) अशी मृतांची नावे असून, उर्वरित एका मृताची ओळख पटलेली नाही. दरम्यान, येथील आग आटोक्यात आणण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातीला तीन फायर इंजिन आणि दोन जंबो टँकर यांच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला आग छाेटी आहे असे वाटत असतानाच शुक्रवारी पहाटे आगीने पुन्हा पेट घेतला. मॉलमधील १०० ते २०० मीटर परिसरातील दुकानांना लागलेल्या या आगीत इलेक्ट्रिक साहित्य, लाकडाचे फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग आणि रुग्णालयातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्याचे काम सुरू असतानाच मॉलच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. आग विझवण्यासाठी रोबो २०, मोटार पंप, १५ जंबो टँकर, ३ वॉटर टँकर इत्यादींसह इतर अत्याधुनिक साहित्याची मदत घेण्यात आली.
आगी सोबतच धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर उठल्याने आग विझविण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, मॉलच्या गच्चीवर काही लोक अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. गच्चीवरील लोकांना सुरक्षित बाहेर काढत असतानाच रुग्णालयातील रुग्णांना अत्यंत सुरक्षित बाहेर काढण्याचे माेठे आव्हान अग्निशमन दलासमोर होते. अग्निशमन दलाच्या मोठ्या शिडीच्या मदतीने येथे अडकलेल्या सुमारे ७१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा आणि रुग्णांचा समावेश आहे. मात्र या आगीत दहा जणांना जिवास मुकावे लागले.
ज्या रुग्णालयास आग लागली त्या रुग्णालयातील ७८ पैकी ४६ रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे. मुलुंड जंबो कोविड रुग्णालय ३०, भांडुप फोर्टिस ४, ठाणे येथील विराज रुग्णालय २, बीकेसी टप्पा १ मध्ये १, घाटकोपर येथील गोदरेज रुग्णालयात १, टँक रोड येथील सारथी रुग्णालयात १, अग्रवाल रुग्णालय ५, होम २ अशा प्रकारे रुग्णांची व्यवस्था करण्यात आली.
.............................