अग्निशमन दलाच्या जवानांना मिळणार अद्ययावत प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 02:14 AM2019-01-25T02:14:04+5:302019-01-25T02:14:18+5:30
आगीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा अग्निशमन दल करीत असले तरी यामध्ये मोठ्या आगीचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई : आगीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा अग्निशमन दल करीत असले तरी यामध्ये मोठ्या आगीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, बचावकार्यात जवान जखमी होऊ लागले आहेत. त्यामुळे जवानांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कांदिवली येथील ठाकूर व्हिलेजमध्ये अग्निशमन दलाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र असणार आहे.
गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी वरळी येथे साधना हाउस या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत १६ जवानांना श्वसनाचा त्रास झाला होता. जवानांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार धुराने भरलेल्या खोलीत, एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्यास मदत कार्यावेळी कोणती खबरदारी घ्यावी, काय टाळावे याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे जवानांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या या विशेष केंद्रात निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या प्रतिकृती तयार करण्यात येतील. जेणेकरून आगीच्या दुर्घटनेदरम्यान मदत कार्य कसे असावे? याबाबत सूचना करणे शक्य होईल. झोपडपट्टीत आग लागली तर कोणती काळजी घ्यावी? मदत कार्य कसे करावे? औद्योगिक वसाहतींमध्ये काय खबरदारी घ्यावी? याबाबत सांगण्यात येणार आहे.
>५१.६९ लाखांचे डिझेल
विविध दुर्घटनांच्या ठिकाणी बचावकार्यासाठी वाहनांचा वापर करावा लागतो. याकरिता दरमहा किमान २४ हजार लीटर डिझेलचा वापर होतो.
आगीची तीव्रता दर्शविण्यासाठी लेव्हल १ ते लेव्हल ५ असे प्रमाण अग्निशमन दलाने निश्चित केले
आहे. त्यानुसार तीन आणि चार म्हणजे गंभीर स्वरूपाच्या आगीचे प्रमाण असे वाढत गेले आहे.
२०१६-२६, २०१७-७९, २०१८-११२