Join us

शहरात दोन ठिकाणी आग

By admin | Published: January 05, 2016 2:58 AM

कांदिवली येथील दामूनगर झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीची घटना ताजी असतानाच, सोमवारी पुन्हा एकदा माहीम पूर्वेकडील एलजी रोडवरील

मुंबई : कांदिवली येथील दामूनगर झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीची घटना ताजी असतानाच, सोमवारी पुन्हा एकदा माहीम पूर्वेकडील एलजी रोडवरील नयानगरमधील झोपड्यांना आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. परळ येथील महात्मा गांधी कामगार रुग्णालयाच्या गोदामालाही सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. काही रेकॉर्डस् जळाले असले, तरी जीवितहानी टळली.सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास नयानगरमधील ३०-३५ झोपड्यांना आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी पाच फायर इंजिन, दोन वॉटर टँकरची मदत घेण्यात आली, शिवाय खबरदारी म्हणून घटनास्थळी एक रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी बाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दुपारी एक वाजता आग पूर्ण विझली. या आगीत जीवितहानी झाली नसून, तीस ते पस्तीस झोपड्यांना आग लागल्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. आगीमागचे कारण अद्याप समजू शकले नसून, याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. महात्मा गांधी रुग्णालयात एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरूआहे. तेथील गोदामात ४ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. आग लागल्यानंतर तत्काळ ५ फायर इंजिन, ३ वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने ५ वाजून २३ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि ५ वाजून ४२ मिनिटांनी आग विझवण्यात आली.