मुंबई : भांडुप पश्चिमेतील ड्रीम्स माॅलमधील सनराईज रुग्णालयास गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. तब्बल ३९ तासांहून अधिक काळ धुमसत असलेल्या या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, अर्ध्याहून अधिक मॉल जळून खाक झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान २ कोविडबाधितांचा मृत्यू झाला होता, त्यांचेही मृतदेह बाहेर काढल्याची माहिती संबंधित रुग्णालयाद्वारे देण्यात आली. तर जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयांना सूचना देऊन सनराईज रुग्णालयातील कोविड रुग्णांना नेऊन सामावून घेण्यासाठी रुग्णवाहिकांसह आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली.
आगीवर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा आग आटोक्यात आली असली तरी शनिवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत येथे कुलिंग ऑपरेशन सुरू होते. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि मुंबई पोलीस घटनास्थळी कार्यरत होते. दुर्घटनेत ज्यांचे अतोनात नुकसान झाले ते सर्व व्यापारी, दुकानदारही घटनास्थळी होते.
अग्निशमन दल, मुंबई पोलीस व इतर यंत्रणांच्या सहकार्याने ६८ रुग्णांची सुखरूप सुटका करून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. एस विभागाचे सहायक आयुक्त यांच्यासह वेगवेगळे अभियंता, आरोग्य अधिकारी, इतर कामगार, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही केली. आग विझविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने १ रोबोट, २० मोटरपंप, १५ जम्बो टँकर, ३ वॉटर टँकर, २ उंच शिड्या, १ उंच फिरती शिडी, श्वसन यंत्रणा असलेली ३ वाहने, १ नियंत्रण कक्ष वाहन यासह इतर वाहने व साधनसामग्री तैनात करून आगीवर नियंत्रण मिळवले.
* ...अन् रुग्णांना श्वास गुदमरण्याचा त्रास
गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावर लागलेली आग काही क्षणात दुसऱ्या मजल्यावरही पोहोचली. त्यातून निघत असलेल्या धुराने तिसऱ्या मजल्यावरील रुग्णालयात कोविड विभाग तसेच अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांना श्वास गुदमरण्याचा त्रास झाला. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासह रुग्णांची सुटका करून त्यांना सुरक्षितपणे जवळपासच्या कोविड रुग्णालयांत स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
* ७८ रुग्ण घेत होते उपचार
तळमजला अधिक ३ मजले या स्वरूपाच्या या मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर सुमारे १०७ बेड असलेले सनराईज हॉस्पिटल कार्यरत होते. दुर्घटना घडली त्यावेळी या रुग्णालयात घटनेप्रसंगी ७८ रुग्ण उपचार घेत होते.
-----------------