मुंबई : माटुंगा येथील बिग बाजारसह गोरेगाव पूर्वेकडील धर्मा प्रॉडक्शनच्या गोदामाला लागलेल्या आगीनंतर भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या अग्निसुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माटुंगा आणि गोरेगाव या दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी घडणाºया अशा घटना रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
रहिवासी आणि औद्योगिक ठिकाणी घडत असलेल्या अशा घटनांतून अग्निसुरक्षेच्या नियमांकडेही प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे असून, महापालिका आणि अग्निशमन दलाने याबाबत कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आग लागत असून, याबाबत सोसायटी आणि व्यावसायिक इमारतींनी आधीच सुरक्षेसंदर्भात काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र याबाबत उदासीनता बाळगण्यात येत आहे. वर्षभरापासून आगीच्या घटनांत वाढ होत आहे. गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असल्यास आग विझविणे सोपे होते. मात्र यंत्रणा बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
नादुरुस्त आणि कालबाह्य झालेल्या यंत्रणा दुरुस्त केल्या जात नाहीत. बदलण्यातही येत नाहीत. परिणामी, समस्या उग्र रूप धारण करते. महत्त्वाचे म्हणजे गेल्या सहा वर्षांत मुंबईत तब्बल २९ हजार १४० आगीच्या दुर्घटना घडल्या असून, यात ३०० जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, मुंबई शहरात ज्या इमारतींना मालमत्ता कर लागू होतो; अशा २ लाखांहून अधिक इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे २५ हजार इमारती सात मजल्यांहून अधिक मजल्यांच्या आहेत. येथे प्रत्येकाने अग्निशमनाचे नियम पाळले पाहिजेत. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
रोज सरासरी घडतात १३ दुर्घटनामुंबईत दरवर्षी सरासरी साडेचार हजार ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडतात. मात्र, गेल्या वर्षीपासून यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१७ मध्ये आगीच्या दुर्घटनेचे प्रमाण दररोज सरासरी १३ एवढे होते.
सर्वाधिक बळी कमला मिल येथे लागलेल्या आगीत गेले. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर एप्रिल महिन्यात लागलेल्या विविध आगीमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे.
सन २०१२ पासून एप्रिल २०१८ पर्यंत एकूण २९ हजार १४० आगी लागण्याच्या घटना घडल्या. यात एकूण ३०० जणांचा मृत्यू झाला. तर एकूण ९२५ जण जखमी झाले. याव्यतिरिक्त १२० अग्निशमन दलाचे अधिकारी / कर्मचारीही जखमी झाले.
...तरच आगीपासूनच वाचणे शक्यउंच इमारतींमधील अग्निशमन यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती महत्त्वाची असून, वर्षातून दोनदा अग्निशमन यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती केली तर याच यंत्रणा मुंबईला आगीपासून वाचवू शकतात.
इमारतींमध्ये फायर हॉस हिल्स, फायर हायड्रेंट सिस्टिम, ऑटोमॅटीक स्प्रिंक्लर सिस्टिम असणे गरजेचे आहे. नुसते असणे महत्त्वाचे नाही, तर या यंत्रणा कार्यान्वित आहेत ना याचीदेखील तपासणी होणे गरजेचे आहे.
विद्युत जोडणीची दाब क्षमता, विद्युत उपकरणे, विद्युत खटके (बटन / स्विच), वायरिंग याबद्दल सजग असणे आवश्यक आहे.
वर्ष | आगीच्या दुर्घटना | मृत्यू |
२०१२-२०१३ | ४ हजार ७५६ | ६२ |
२०१३-२०१४ | ४ हजार ४०० | ५८ |
२०१४-२०१५ | ४ हजार ८४२ | ३२ |
२०१५-२०१६ | ५ हजार २१२ | ४७ |
२०१६-२०१७ | ५ हजार २१ | ३४ |
२०१७-२०१८ | ४ हजार ९२७ | ५५ |
२०१८ पासून एप्रिलपर्यंत | ७१० | ५ |