फटाका मार्केट फुल, विविध ठिकाणांहून फटाके दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 06:12 AM2020-11-07T06:12:20+5:302020-11-07T06:16:55+5:30
Fire cracker market : कोरोनामुळे यंदा फटाक्यांचे भाव देखील १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र तरीदेखील नागरिकांनी फटाक्यांच्या दुकानातून फटाके खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असल्याने मुंबईतील फटाका मार्केट फटाक्यांनी भरले आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फटाक्यांच्या मागणीत काहीप्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे यंदा फटाक्यांचे भाव देखील १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र तरीदेखील नागरिकांनी फटाक्यांच्या दुकानातून फटाके खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत विक्रीसाठी येणारे फटाके महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांसोबतच मुख्यतः कर्नाटक, केरळ व मध्यप्रदेश या राज्यातून येतात. मुंबईतील मशिद बंदर, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी व बोरीवली याठिकाणी फटाका व्यापाऱ्यांचे मोठे गोदाम आहेत. या ठिकाणी सुरक्षेचे सर्व नियम पाळून फटाक्यांची आवक झाली आहे.
कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्के फटाक्यांची अवक झालेली आहे. मुंबईत कोणत्याही मैदानावर फटाके विक्री केली जात नाही. व्यापाऱ्यांचे मोठे गोदाम असल्याने गोदामातून अथवा दुकानातूनच सर्व नियम पाळून फटाक्यांची विक्री केली जात आहे.
दरवर्षी फटाक्यांचा बाजार. या वर्षीची स्थिती
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी यांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण व उत्सव साधेपणाने साजरे केल्याने फटाक्यांची विक्री झाली नाही. मुंबईत दरवर्षी फटाक्यांची ४०० ते ५०० कोटींची उलाढाल होते. मात्र यंदा २५० ते ३०० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.
कोरोनाचा विळखा सैल होत असल्याने दिवाळीत फटाक्यांची चांगल्या प्रकारे विक्री होईल अशी आम्हाला आशा आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या एका होलसेल दुकानात दिवसाला ५० ते ६० लाखांची उलाढाल अपेक्षित आहे.
- सागीर अक्रम,
फटाक्यांचे होलसेल व्यापारी, कुर्ला