मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस कमी होत असताना दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात 5246 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 177 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 11277 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र दिवाळीत राज्यात कोरोनाची दूसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन्स) जारी केल्या आहेत. त्यात दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करतानाच अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रामुख्याने नागरिकांनी यावर्षी फटाके टाळावे व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहनही राज्य सरकारने केले आहे.
राज्य सरकारने दिवाळीसाठी जाहीर केलेली गाइडलाइन्स पुढील प्रमाणे आहे-
- राज्यात प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे दिवाळीही अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावी.
- नागरिकांनी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.
- दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच उत्सव काळात नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लहान मुलांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे.
- दिवाळीदरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. असा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक अशा माध्यमांतून करावा.
- फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोनाचं संक्रमन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा.
- कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे संबंधित विविध विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक असेल.