मुंबई : मुंबईतील हवेच्या प्रदूषणात सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा आणखी भर टाकत आहे. तरीही मात्र दिवाळीचा आनंद चारच दिवस मिळतो, या कारणासह मुंबईकर मनसोक्त फटाके फोडत असून त्याचा कचराही जाळत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पुन्हा सोमवारी मुंबईच्या हवेचा दर्जा वाईट असल्याचे दिसून आले. ७ जूनपासून ते १३ नोव्हेंबरपर्यंत कचरा जाळण्याच्या एकूण २८ तक्रारी हेल्पलाइनला आल्या आहेत. मात्र दिवाळीतील वातावरण पाहता यात वाढ होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
यातील १८ तक्रारी पालिकेकडून सोडविण्यात आल्या असून १० तक्रारी पालिकेला सोडविता आलेल्या नाहीत. राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत २६ ऑक्टोबरला वायूप्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यातील अनुक्रमांक ९ मध्ये कचरा जाळण्यावर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार पालिका कार्यक्षेत्रात कचरा जाळणे हा गुन्हा आहे. मुंबई महानगर व परिसरात वायूप्रदूषणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनास सहकार्य करावे व कचरा जाळताना कोणी आढळल्यास त्यांची तक्रार ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई’ हेल्पलाइनवर करावी, असे आवाहन पालिकेने केेले आहे.
आर उत्तर, जी उत्तरमधून जास्त तक्रारी
जी उत्तर विभागातून सर्वाधिक म्हणजे ७ कचरा जाळण्याच्या तक्रारी आहेत तर ५ तक्रारी एच पश्चिम विभागातून आहेत. त्यानंतर आर उत्तर व एस विभागातूनही पालिकेला कचरा जाळण्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी पालिकेकडून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना या हेल्पलाइन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा विषयक तक्रारी ही नोंदविता येतात. वायूप्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.