Join us

मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन करून बिनधास्त फोडले गेले फटाके; दिवाळीच्या दोन रात्री ३६ आगीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 4:46 PM

बहुतांश आगी ह्या फटाक्यां मुळे लागलेल्या असल्याचे स्पष्टच असून पोलीस , महापालिका आणि नगरसेवक ह्याला कारणीभूत असल्याचे आरोप जागरूक नागरिक करत आहेत .

मीरारोड - फाटके आणि ध्वनिप्रदूषणावर बंदी असून देखील मीरा भाईंदर मध्ये मात्र सर्रास दिवाळीच्या गुरुवार व शुक्रवारच्या रात्री मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आले . या मुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊन देखील पोलिसांसह महापालिके कडून मात्र कारवाई झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे . तर शहरात दिवाळीच्या दोन रात्रीत आगीच्या तब्बल ३६ घटना घडल्या असून बहुतांश घटना फटाक्यां मुळे घटना घडल्या आहेत . 

मोठ्या आवाजाच्या प्रदूषणकारी फटाक्यांना बंदी असून त्याच सोबत ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायदा आदींचे मीरा भाईंदर मध्ये दिवाळी निमित्त सर्रास उल्लंघन केलेले दिसून आले . गुरुवारी व शुक्रवारी अश्या दिवाळीच्या दोन रात्री आणि मध्यरात्री नंतर देखील सर्रास मोठे फटाके फोडले जात होते .  

मुळात महापालिकेनेच नियमबाह्यपणे फटाके विक्रीच्या वारेमाप परवानग्या देऊन मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि भारतीय विस्फोटक कायद्यासह शासन आदेशाचे उल्लंघन केले . लोकांच्या सुरक्षे ऐवजी फटाके विक्रेत्याना फायदा करून देत त्यांची मर्जी सांभाळली . पालिकेनेच नियमबाह्य परवानग्या देत बेकायदा स्टॉल वर कारवाई टाळून जाणीवपूर्वक शहरात फटाके फोडण्यासह ध्वनी व वायू प्रदूषण करण्यास मोकळीक दिली . न्यायालयाच्या आणि शासन निर्देशांना केराची टोपली दाखवली . 

त्यातूनच शहरात मोठ्या प्रमाणात फटाके उपलब्ध होऊन ते फोडण्याचे प्रमाण देखील मोठे होते . गुरुवारी रात्री शहरात तब्बल २७ ठिकाणी आगी  लागण्याच्या घटना घडल्या आहेत . त्या मध्ये तब्बल १९ ठिकाणी आगी ह्या फटाक्यांच्या कचऱ्या मुळे तर ७ ठिकाणी आगी ह्या शॉर्टसर्किट मुळे तर रामदेव पार्क येथील एका गॅरेजला आग लागल्याचे अग्निशमन दला कडून सांगण्यात आले . 

ओम वसुंधरा इमारतीत कपड्याच्या दुकानास आग लागून ३ लाखांचे नुकसान झाले .  पूनम गार्डन , सिल्वर पार्क , नया नगर , विजय पार्क , पेणकरपाडा , कनकिया , ठाकूर मॉल जवळ , विनय नगर , शिवार उद्यान , डिव्हाईन चर्च समोर, भीमसेन जोशी रुग्णालया जवळ , भाईंदर बसडेपो जवळ , आझाद नगर  आदी परिसरात आगी लागण्याच्या घटना घडल्या . महापालिकेच्या त्या त्या भागातील अग्निशमन दलाच्या जवानांनी जाऊन आगी नियंत्रणात आणल्या . 

शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे दरम्यान देखील फटाक्यां मुळे ८ ठिकाणी तर शॉर्टसर्किट मुळे एका ठिकाणी आग लागली . भाईंदर पूर्वेच्या खारी गावात नगरसेवक राकेश शाह यांच्या भावाच्या नावे असलेल्या मंडप डेकोरेटरच्या सामानास फटाक्यां मुळे शनिवारी पहाटे आग लागली . आग इतकी भीषण होती कि त्यावर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलास तब्बल दोन तास लागले . आगीत बहुतांश सामान जाळून खाक झाले असून फाटक्या मुळे सदर आग लागली . 

नवघर अग्निशमन केंद्रा मागील सत्संग कुंपणातील बांबू फटाक्यां मुळे पेटले . सरस्वती नगर येथील सचिन तेंडुलकर मैदाना जवळ मंडप - डेकोरेटर्सच्या ताडपत्रीला फटाक्याने आग लागली . मीरारोडच्या देव पॅरेडाइज मधील एका सदनिकेच्या गॅलरीत फटाक्या मुळे आग लागली . भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक येथील आरबीके शाळे जवळ तसेच  न्यूगोल्डन नेस्टच्या महालक्ष्मी स्वीट गल्लीत फटाक्याने मुळे कचरा पेटला . 

मीरारोडच्या इंडियन ऑइल पंप बाजूला मध्यरात्री फटाक्यां मुले आग लागली . पेणकरपाडा अग्निशमन केंद्र जवळ म्हाडा इमारती बाजूला फटाक्यां मुळे तर  गीता नगर फेज २ येथील गीतांजली इमारती समोर शॉर्टसर्किट मुळे आग लागली . सुदैवाने कोणत्याही घटनेत जीवित हानी झालेली नाही . अग्निशमन दलाच्या जवानांनी ठिकठिकाणा वरून येणाऱ्या आगीच्या घटनाचे कॉल घेत त्वरित घटना स्थळी जाऊन आगी विझवण्याचे काम केले . लोकांच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी आधी घेत लोकांना सुखरूप बाजूला केल्याचे अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले . 

बहुतांश आगी ह्या फटाक्यां मुळे लागलेल्या असल्याचे स्पष्टच असून पोलीस , महापालिका आणि नगरसेवक ह्याला कारणीभूत असल्याचे आरोप जागरूक नागरिक करत आहेत . फटाक्यां मुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुराचे वलय आकाशात दिवसा सुद्धा जाणवत होते . धुरा मुळे आणि आवाज मुळे रुग्ण , वृद्ध व बाळांना त्रास सहन करावा लागला . 

 

टॅग्स :फटाकेमुंबई