मुंबई- राज्याच्या विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाली असून, माझ्या दालनासह अनेक ठिकाणी रिफिलची मुदत संपलेलीच उपकरणे लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात दिली.
विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून या गंभीर प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, संपूर्ण विधानसभवनात अनेक ठिकाणी मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे आहेत. माझ्या दालनात देखील २० नोव्हेंबर २०१७ रोजी मुदत संपलेले उपकरण लागले आहे. दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडली तर शेवटच्या क्षणी काय करायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या मुद्यावर तालिका सभापतींनी यासंदर्भात सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याची घोषणा केली.