Join us  

अग्निशमन दलाची रुग्णवाहिका पलटली

By admin | Published: February 04, 2016 2:47 AM

गेल्या गुरुवारपासून धुमसणाऱ्या देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीवर नियंत्रण आणण्यासाठी घटनास्थळी दाखल होत असताना

मुंबई : गेल्या गुरुवारपासून धुमसणाऱ्या देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीवर नियंत्रण आणण्यासाठी घटनास्थळी दाखल होत असताना, अग्निशमन दलाची रुग्णवाहिका विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर उलटली. या अपघातात अग्निशमन दलाचे सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.देवनार डम्पिंग ग्राउंडवर २८ जानेवारी रोजी आग लागली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करून, यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आग आटोक्यात येत असताना मंगळवारी रात्रीच्या सुमारास या आगीने पुन्हा पेट घेतल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास अग्निशमन दलाची रुग्णवाहिका सहा कर्मचाऱ्यांसह भरधाव वेगाने देवनार डम्पिंग ग्राउंडकडे जात असताना, विक्रोळी येथे नियंत्रण सुटल्याने उलटली. यात सहायक केंद्र अधिकारी पुरबे, प्रमुख अग्निशामक मुरलीधर अनाजी, अग्निशामक राजू तुळशीराम कोकतर, संजय सावंत, पंडित कदम, नितीन पाटील अशी जखमींची नावे आहे. यापैकी सावंत, कदम व कोकतर यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)