अग्निशमन दल खासगीकरणाच्या वाटेवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:06 AM2021-02-07T04:06:57+5:302021-02-07T04:06:57+5:30
कंत्राटी पद्धतीने ५४ वाहन चालकांची भरती प्रस्तावित लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आर्थिक काटकसरीसाठी महापालिकेने नोकरभरती बंद केली आहे. ...
कंत्राटी पद्धतीने ५४ वाहन चालकांची भरती प्रस्तावित
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक काटकसरीसाठी महापालिकेने नोकरभरती बंद केली आहे. मात्र अनेक पदे रिक्त असलेल्या मुंबई अग्निशमन दलाला या निर्णयाचा फटका बसत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने दलातील जीप व हलकी वाहने चालविण्यासाठी ५४ वाहन चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, ही भरती कंत्राटी पद्धतीने खाजगी संस्थेच्या माध्यमातून करीत अग्निशमन दलाने खासगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
महापालिकेचा आस्थापना खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून कोविड काळात आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. तत्पूर्वी तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नवीन भरती बंद करण्यात येत असल्याचे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जाहीर केले होते. दरम्यान, अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने त्याचा फटका सेवा-सुविधांना बसू लागला आहे. त्यामुळे कोविड काळात महापालिकेने कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती केली होती. याच पद्धतीने आता अग्निशमन दलातही खासगी सेवा घेतली जाणार आहे.
काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या समितीने रुग्णवाहिका व इतर लहान वाहने चालविण्यासाठी खाजगी वाहन चालकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस केली. त्यानुसार १० साधारण रुग्णवाहिका, दलात असलेल्या जीप व अग्निसुरक्षा पालन कक्षातील २४ जीप चालविण्यासाठी खाजगी वाहन चालकांची पदे निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार दोन वर्षांकरिता ५४ वाहन चालकांची भरती केली जाणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.
* अग्निशमन दलात ६६५ यंत्रचालकांची पदे अग्निशामक वर्गातून पदोन्नतीने भरली जातात. या पदांवर किमान पाच वर्षे अग्निशामक म्हणून कामाचा अनुभव, एक वर्ष जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक असते.
* आतापर्यंत ६६५ यंत्रचालकांपैकी ५०७ पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित आरक्षित पदांसाठी उमेदवार मिळत नसल्याने १५८ पदे रिक्त आहेत.
* या निविदेमध्ये केएचएफएम हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला दोन वर्षांकरिता ५४ चालक उपलब्ध करून देण्यासाठी पावणेचार कोटींचे कंत्राट देण्यात येणार आहे.