खालापूर (जि. रायगड) : खालापूर तालुक्यात मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेलगत बुधवारी लागलेल्या आगीत रिलायन्स सिलिकॉन कंपनी भस्मसात झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र अजूनही आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.पाली फाटा येथील या केमिकल कंपनीला बुधवारी सायंकाळी लागलेली आग इतकी भीषण होती की कंपनीतील रसायनांनी भरलेले ड्रम हवेत फेकले गेले. धुरामुळे काही काळ मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरची वाहतूक सुरक्षेच्या कारणासाठी थांबविण्यात आली तर, पाली-खोपोली राज्यमार्ग काहीकाळ बंद करण्यात आला होता. तसेच आसपासच्या लोकांना पोलिसांनी तत्काळ दुसऱ्या ठिकाणी हलविले होते. औद्योगिक सुरक्षा धोक्यात तालुक्यात वारंवार कारखान्यांना लागणाऱ्या आगीमुळे औद्योगिक सुरक्षा धोक्यात आली असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या घटनांमुळे कामगारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिलायन्स कंपनीच्या आगीच्या घटनेपूर्वी रसायनीसह संपूर्ण खालापूर तालुक्यात कंपन्यांना आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत.