मुंबईतील अडीचशे रुग्णालयांमध्ये आगीशी खेळ; अग्नी सुरक्षेचे नियम धाब्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 02:26 AM2021-03-27T02:26:18+5:302021-03-27T06:22:17+5:30
नागरिक सतत भक्ष्यस्थानी
मुंबई : गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिटी सेंट्रल मॉलला लागलेल्या आगीनंतर महापालिकेने केलेल्या ऑडिटमध्ये मुंबईतील ७६२ नर्सिंग होम, रुग्णालये असुरक्षित असल्याचे उजेडात आले. अग्नी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून या रुग्णालयांमध्ये मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू असतो. पालिकेने दिलेल्या मुदतीत यापैकी काही रुग्णालयांनी आवश्यक दुरुस्त्या केल्या तर अडीचशे रुग्णालयांमध्ये अद्यापही बदल करण्यात आलेले नाहीत.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील आगीच्या घटनेनंतर रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे अग्निशमन दलाने जानेवारी २०२१ पासून महिन्याभराच्या कालावधीत १,३२४ रुग्णालयांची झाडाझडती घेतली. यामध्ये सरकारी, पालिका व खासगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि प्रसूतिगृहे यांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये केलेल्या ऑडिटनुसार ७१३ खासगी, तीन सरकारी आणि ४६ महापालिका रुग्णालयांमध्ये अग्नी सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले.
महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत संबंधित रुग्णालयांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यानुसार त्यांना आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी १२० दिवसांची मुदत देण्यात आली. यापैकी आतापर्यंत २१९ खासगी, तीन सरकारी आणि २८ महापालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती अग्निशमन दलातील सूत्रांकडून मिळाली. या रुग्णालयांना दिलेली मुदत संपत आल्याने त्यांच्यावर लवकरच कारवाई अपेक्षित आहे. ही कारवाई झाली तरी यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.
रुग्णालयांमध्ये ही यंत्रणा आवश्यक
फायर अलार्म, फायर स्प्रिंकलर्स अंतर्गत अग्नी प्रतिबंधक उपायांसाठी फायर एक्झींग्युशर, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र जिने, व्हरांड्यात, जिन्यात कोणतेही अडथळे, अडगळ नसावी; इमारतीची उंची आणि क्षेत्रफळानुसार उपायांचे स्वरूप बदलते.
३८ रुग्णालये बंद करण्याची शिफारस
मुंबईतील १,१०९ रुग्णालयांपैकी ३८ रुग्णालये तत्काळ बंद करण्याची शिफारस पालिका आणि अग्निशमन दलाच्या अग्निसुरक्षा पालन कक्षाने केली होती. त्यानुसार संबंधित प्रभाग कार्यालयाने याबाबत सूचना दिल्या होत्या.