गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रेत्यांना मनाई; थेट परवानाच रद्द होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:44 AM2019-03-25T02:44:05+5:302019-03-25T02:44:19+5:30
गर्दीच्या ठिकाणी अथवा निवासी इमारतीमध्ये फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करण्यास मनाई आहे, तरीही अनेक ठिकाणी राजरोस अशी विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई : गर्दीच्या ठिकाणी अथवा निवासी इमारतीमध्ये फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करण्यास मनाई आहे, तरीही अनेक ठिकाणी राजरोस अशी विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या अशा फटाके विक्रेत्यांचा थेट परवानाच रद्द करण्याची कारवाई महापालिका करीत आहे. अशा ९८ विक्रेत्यांचे परवाने आतापर्यंत रद्द करण्यात आले आहेत.
सणासुदीच्या काळात फटाके उडवून आनंद साजरा करण्याची प्रथाच पडली आहे. अलीकडे क्रिकेट सामन्यात भारताचा विजय, राजकीय नेत्यांचे वाढदिवस, निवडणुका आदी काळातही मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जातात. मात्र, फटाक्यांसारख्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागण्याची घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी संभावते. त्यामुळे फटाक्यांचा साठा लोकवस्तीबाहेर ठेवण्याची अट घालण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक अॅड. ज्ञानमूर्ती शर्मा यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे पालिकेच्या महासभेत केली होती.
सन २०१५ मध्ये या संदर्भात उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल झाली होती. फटाक्यांची विक्री व साठा करण्यास पालिका अधिनियम १८८८ कलम ३९४ अंतर्गत परवानगी देण्यात येते. मात्र, या याचिकेवरील २५ आॅक्टोबर, २०१६ रोजी न्यायालयाने दिलेल्या निर्णयात निवासी इमारतींमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्री व साठवणूक करण्यास परवानगी देऊ नये, तसेच विस्फोटक अधिनियम १८८४ व २००८ च्या नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार, अटी न पाळणाºया विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे.