Join us

कळव्यात तरुणीवर गोळीबार

By admin | Published: March 19, 2016 2:27 AM

एकतर्फी प्रेमातून जवळची नातेवाईक असलेल्या १५वर्षीय तरुणीवर गोळीबार करणाऱ्याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाल्याने मुंबईच्या किंग एडवर्ड

ठाणे : एकतर्फी प्रेमातून जवळची नातेवाईक असलेल्या १५वर्षीय तरुणीवर गोळीबार करणाऱ्याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाल्याने मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात तिला दाखल केले आहे. तर, ठाणे न्यायालयाने २२ मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत केला आहे.आरोपी कमलकांत सैनी (१९) हा मूळचा राजस्थानमधील डवसा जिल्ह्यातील आहे. गेल्या १५ दिवसांपासून आपल्या मामेबहिणीकडे तो वास्तव्यासाठी आला होता. तिचे शालेय शिक्षण सुरू असून, शुक्रवारी सकाळी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तिने ‘होकार’ देण्यासाठी तो पाठी लागला होता. यातूनच त्याने तिच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली. सकाळी ८.४५ वा.च्या सुमारास त्याने तिच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ती तिच्या मानेच्या भागात रुतली. जखमी अवस्थेतच तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, कळव्यात ही शस्त्रक्रिया होऊ न शकल्यामुळे तिला मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, दोघांच्याही नातेवाइकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)