Join us

डोंबिवलीत बारबाहेर गोळीबार; एक जखमी

By admin | Published: December 17, 2015 12:58 AM

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकृपा लेडिज बारसमोर बुधवारी मध्यरात्री गोळीबार झाला. त्यात कमल यादव (४५) जखमी झाला असून, त्याला एम्स रुग्णालयात दाखल केले

डोंबिवली : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकृपा लेडिज बारसमोर बुधवारी मध्यरात्री गोळीबार झाला. त्यात कमल यादव (४५) जखमी झाला असून, त्याला एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. बांधकाम व्यावसायिक जितेंद्र उर्फ जितू म्हात्रे (वय ३९) याला मानपाडा पोलिसांनी रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे. त्याला १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.बुधवारी १२.३० च्या सुमारास गुरुकृपा लेडिज बारमध्ये जितेंद्र म्हात्रे आणि त्याचे दोन साथीदार आले होते. मेडिकल स्टोअरचे काम करणारा कमल हा देखील त्याच बारमध्ये आला होता. बारमधून बाहेर पडत असताना, कमलचा धक्का जितूला लागला. यामुळे दोघांमध्ये हाणामारी झाली. जितूने रिव्हॉल्व्हरमधून पहिली गोळी हवेत, तर दुसरी कमलवर झाडली. कमलच्या डाव्या मांडीला ती लागली. गोळीबाराच्या आवाजाने त्या रस्त्यावरच्या सर्व बार मालकांनी बंद केले. मानपाडा पोलिसांनी धाव घेऊन कमलला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असून, ती गोळी त्याच्या मांडीला घासून गेली आहे. जितेंद्रविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात कमल यादव याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पहाटे ५ वाजता गोळवलीतून जितेंद्रला अटक केली आणि त्याचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर जप्त केले. पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी सांगितले की, आरोपी जितू म्हात्रे आणि जखमी कमल यादव हे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे असून, दारूच्या नशेत धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा प्रकार घडला आहे.मोबाइलने तारले दारूच्या नशेत असलेल्या जितू म्हात्रेने त्याच्याजवळील परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून केलेल्या गोळीबारात यादव हे किरकोळ जखमी होऊन बचावले. जेव्हा गोळीबार झाला, तेव्हा सुदैवाने यादव यांचा मोबाइल त्यांच्या डाव्या बाजूच्या खिशात होता. त्यामुळे ती गोळी त्यांच्या मांडीत न घुसता, मोबाइलमध्ये घुसल्याने त्यांना किरकोळ जखम झाली.