मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे ४.५५ वाजता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर घडली.दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर केल्याचे म्हटले जात आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली असून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहे. दरम्यान, याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका टेलिव्हिजन मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने उघडपणे सांगितले होते की, सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट आहे. अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानावरही लॉरेन्स बिश्नोईने हल्ला केला होता आणि सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे हा हल्ला झाल्याचे म्हटले होते.
लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. सलमान खानला सध्या वाय प्लस सुरक्षा पुरवली जाते. गेल्या वर्षी सलमान खानच्या ऑफिसला धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला होता. सलमान खानच्या जवळच्या प्रशांत गुंजाळकरला रोहित गर्गकडून धमकीचा मेल आला होता. या ईमेल प्रकरणात आयपीसीच्या कलम ५०६ (२), १२० (बी) आणि ३४ अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.