खंडणीसाठीच बिल्डरवर केला गोळीबार
By Admin | Published: February 7, 2016 01:27 AM2016-02-07T01:27:43+5:302016-02-07T01:27:43+5:30
चुनाभट्टी परिसरात शुक्रवारी जिनेश जैनवर खंडणी न दिल्याने गोळीबार करण्यात आल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांना खंडणीसाठी धमकाविण्यात येत होते.
मुंबई : चुनाभट्टी परिसरात शुक्रवारी जिनेश जैनवर खंडणी न दिल्याने गोळीबार करण्यात आल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांना खंडणीसाठी धमकाविण्यात येत होते. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, जखमी जिनेश यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबई आणि नवी मुंबईतील प्रतिष्ठीत बिल्डर रुपचंद जैना यांचा जिनेश हा मुलगा असून त्यांचे कार्यालय चुनाभट्टीतील त्रिमूर्ती चौक येथे आहे. शुक्रवारी सायंकाळी बुरखा घालून महिलेच्या वेषात दोन इसम याठिकाणी आले. त्यांनी जिनेशवर पाठीमागून दोन गोळ्या झाडल्यानंतर पळ काढला. पोलिसांना घटनास्थळावरुन कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून यामध्ये दोन्ही हल्लेखोर फायरिंग कराताना कैद झाले आहेत. मात्र दोघांनीही पुर्ण बुरखा घातल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. हा हल्ला केवळ त्यांना घाबरवण्यासाठी असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)