Join us

मुंबईतल्या पहिल्या वन स्टाॅप सेंटरचे के.ई.एम. रुग्णालयात लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 7:06 PM

निर्भया कायद्यानुसार अत्याचार पिडित महिलांना एकाच ठिकाणी आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टाॅप सेंटर’ असणे अनिवार्य आहे.

मुंबई: अत्याचार पिडित महिलेला एकाच ठिकाणी वैद्यकीय उपचार, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि निवारा मिळावा या हेतुने केंद्र शासनाच्या संकल्पनेतील आणि मुंबईतील पहिले ‘वन स्टाॅप सेंटर’ केईएम रुग्णालयात सुरु झाले असुन आज केंद्रीय महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी, या सेंटरसाठी पाठपुरावा करणारे मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. 

निर्भया कायद्यानुसार अत्याचार पिडित महिलांना एकाच ठिकाणी आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टाॅप सेंटर’ असणे अनिवार्य आहे. केंद्राच्या महिला बाल विकास विभागाच्या सुचनांनुसार या सेंटरमधे येणार्या महिलेला समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, प्रसंगी निवारा मिळावा असे निर्देश आहेत. 

मुंबई शहरातील पहिले वन स्टाॅप सेंटर सुरु होण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड आशिष शेलार यांनी गेले साडे तीन वर्ष सतत पाठपुरावा केला होता. मा. मुख्यमंत्र्यांकडे याविषयी बैठक लावुन आयुक्तांच्या माध्यमातुन मुंबईच्या सेंटर करिता आवश्यक प्रक्रिया पुर्ण केली होती. या प्रयत्नांना यश येत आज केंद्र शासनाचा महिला बाल विकास विभाग, जिल्हाधिकारी मुंबई शहर आणि के.ई.एम. रुग्णालय (मुंबई महानगरपालिका) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर सेंटर सुरु झाले आहे. 

या सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार काम करत आहे. पिडीत महिलेला मदत मिळावी यासाठी देशभरात अशी सेंटर होत असुन मुंबई सारख्या शहरात ही याची आवश्यकता आहे. महिलेलर अन्याय न होणं ही पुरुषांची, समाजाची ही जबाबदारी असल्याच त्यांना यावेळी सांगितलं.

यावेळी राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले की, या सेंटरला शुभेच्छा देणार नाही कारण या प्रकारच्या सेंटरचा उपयोग कमी व्हावा असा समाज निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे सेंटर के.ई.एम. रुग्णालयात सुरु होत आहे. याठिकाणी जवळपास ४० वर्षे अरुणा शानभाग यांची सेवा के.ई.एम. च्या डाॅक्टर, कर्मचार्यानी निरलसपणे केली त्यामुळे या सेंटरला अरुणा शानभाग यांचे नाव द्यावे अशी सुचना त्यांनी यावेळी महापालिकेला केली. 

याप्रसंगी आमदार अजय चौधरी, महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले, मुंबई पोलिस अतिरिक्त आयुक्त कर्णिक, मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, महिला बाल विकास सचिव आय ए कुंदन, नगरसेविका रिटा मकवाना, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, मुंबई भाजप महामंत्री शलाका साळवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :आशीष शेलारभाजपाकेईएम रुग्णालयमुंबई