Join us

अंधेरीत मुंबईतील पहिले ५५ सीटर जम्बो शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:51 AM

ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या २०० फूट उंचीच्या बेसाल्ट टेकडीसाठी प्रसिद्ध असलेल्या, अंधेरी पश्चिम गिल्बर्ट हिल येथील झोपडपट्टीत

मनोहर कुंभेजकरमुंबई : ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या २०० फूट उंचीच्या बेसाल्ट टेकडीसाठी प्रसिद्ध असलेल्या, अंधेरी पश्चिम गिल्बर्ट हिल येथील झोपडपट्टीत राहणा-या नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्वांत मोठे आणि पहिले ५५ सीटर दुमजली जम्बो शौचालय उभे केले आहे. त्यामुळे हा परिसर आता हागणदारीमुक्त झाला आहे. या ठिकाणी इंग्लिश, भारतीय शौचकूप आणि अपंगांसाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. अत्याधुनिक शौचालयामध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन तसेच वापरलेले सॅनिटरी पॅड बर्निंग मशिन बसविण्यात आले आहे. या शौचालयाचा लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका मेहर मोहसीन हैदर यांनी शौचालयाची संकल्पना पालिका प्रशासनाकडे मांडली. त्या म्हणाल्या की, वॉर्ड क्रमांक ६६ची लोकसंख्या सुमारे १ लाख इतकी आहे. त्यापैकी ६५ हजार नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांच्या सोयीसाठी आम्ही अशा प्रकारची ११ शौचालये बांधली आहेत. या शौचालयाचा वरचा मजला हा पुरुषांसाठी, तर खालील मजला स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने २०१८मध्ये मुंबईत १८ हजार ८८१ शौचकूपांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी प्रशासनाला मान्यता दिली होती.

यासाठी ३७६ कोटींचा निधी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत अनेक एक मजली, दुमजली आणि तीन मजली शौचालये बांधली जाणार आहेत. सहायक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, स्लम सॅनिटेशन कार्यक्रमांतर्गत या शौचालयासाठी १.२ कोटींचा निधी खर्च झाला आहे. शौचालयाच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या शौचालयाची स्वच्छता, देखभालीचे काम संस्थेला देण्यात येईल.