मनोहर कुंभेजकर
मुंबई: गणेश मूर्त्या या पीओपी व शाडूच्या मातीच्या बनवलेल्या असतात.दरवर्षी लाखो घुरगुती व हजारो सार्वजनिक गणेश मूर्तींचे समुद्रात विसर्जन होते.यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते,आणि अनेक जलचर प्राण्यांची अंडी व पिल्ले मरतात. त्यामुळे मुंबईत सर्वप्रथम कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची संकल्पना 2007 साली दहिसर पश्चिम येथे स्टेशन समोर असलेल्या तावडे वाडीत मुंबईच्या माजी महापौर डॉ.शुभा राऊळ यांनी सुरू केली. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची उभारणी 2008 पासून सुरू झाली. शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात 2008 साली डॉ.शुभा राऊळ यांनी कृत्रिम तलावाची उभारणी केली.
कृत्रिम तलाव हा अंतिम पर्याय नसून पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी गणेश भक्तांनी मातीच्या गणेश मूर्तींचे घरात विसर्जन करावे किंवा धातूच्या मूर्तींची घरात प्रतिष्ठापना करावी अशी भूमिका डॉ.शुभा राऊळ यांनी लोकमतशी बोलतांना मांडली. केरळ मध्ये ज्या तळ्यातून मातीं आणली जाते,तिथेच गणेश मूर्तींचे विसर्जन होते अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षा पर्यंत मुंबईत कृत्रिम तलावांची संख्या मर्यादित होती. मात्र यंदा कोरोनामुळे चौपाट्यांवर प्रवेश बंदी आहे.तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी विसर्जनाला जास्त गर्दी करू नये म्हणून पालिका प्रशासनाने 167 ठिकाणी मुंबईत कृत्रिम तलावांची उभारणी केली आणि नागरिकांनी समुद्रात किंवा नैसर्गिक तलावात विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास पसंती दिली. त्यामुळे मुंबईतील दिड दिवसांच्या 40000 गणपतीं पैकी 60 टक्के गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले.
दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन नुकतेच सुरळीत पार पडले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा पालिकेने मुंबईत यंदा 167 ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत. कोरोनामुळे पश्चिम उपनरातील नागरिकांनी यंदा दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास पसंती दिली असून पश्चिम उपनगरात कृत्रिम तलाव संकल्पनेला मिळाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
के पश्चिम वॉर्ड ( विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम) मध्ये दिड दिवसांच्या 1595 गणेश मूर्तींचे ,समुद्रात 1190 गणेश मूर्तींचे तर फिरत्या तलावात 65 गणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीत पार पडले अशी माहिती के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी लोकमतला दिली. के पश्चिम वॉर्ड मध्ये पालिकेने यंदा 12 ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली होती.तर प्रामुख्याने लोखंडवाला बॅक रोड येथील कृत्रिम तलावात सर्वात जास्त 573 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले,तर अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे 167 गणेश मूर्तींचे,संत रामदास 166 गणेश मूर्तींचे,तर जुहूच्या नोवाटेल हॉटेल येथे 150 गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले अशी माहिती विश्वास मोटे यांनी दिली.
पी दक्षिण वॉर्ड ( गोरेगाव पूर्व व पश्चिम) येथे 11 ठिकाणी उभरलेल्या कृत्रिम तलावात 1942 घरगुती व 35 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले.तर फिरत्या विसर्जन कृत्रिम तलावात 109 घरगुती व 3 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीत पार पडले अशी माहिती पी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंड यांनी दिली. पी उत्तर वॉर्ड(मालाड पश्चिम व मालाड पूर्व) हा सुमारे 10 लोकसंख्येचा पश्चिम उपनगरातील मोठा वॉर्ड आहे.या वॉर्ड मध्ये विविध ठिकाणी उभरलेल्या कृत्रिम तलावात 1696 गणेश मूर्तींचे,5 ठिकाणी तापूरत्या टाक्यांमध्ये 219 ठिकाणी तर फिरत्या तलावात 2 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले अशी माहिती पी उतर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली.
परिमंडळ 7 मध्य 29 ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिली. आर दक्षिण( कांदिवली पूर्व व पश्चिम),आर मध्य( बोरिवली पूर्व व बोरिवली पश्चिम),व आर उत्तर (दहिसर पूर्व व पश्चिम) हे तीन वॉर्ड येत असून सुमारे 18 लाख लोकसंख्या आहे. आर दक्षिण वॉर्ड मध्ये 10 ठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावात 3772 घरगुती व 68 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले,आर मध्य वॉर्ड 11 ठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावात 2778 घरगुती व 111 सार्वजनिक तर आर उत्तर वॉर्ड मध्ये 8 ठिकाणी 1603 घरगुती व 257 सार्वजनिक गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले अशी माहिती परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी लोकमतला दिली. परिमंडळ 7 मध्ये एकूण 7653 घरगुती व 257 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीत पार पडले अशी आकडेवारी उपायुक्त शंकरवार यांनी दिली. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीने अंधेरीच्या राजाच्या मंडपा समोर उभारलेल्या कृत्रिम तलावात दिड दिवसांच्या 23 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले.