आधी हिशेब मागितला नंतर एसटीला दिले केवळ २२३ कोटी, आज होईल पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 06:45 AM2023-02-17T06:45:42+5:302023-02-17T06:46:25+5:30
आज होणार जानेवारीचा पगार, मागितले होते एक हजार १८ कोटी
दीपक भातुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे एक हजार १८ कोटी रुपये मागितले होते, मात्र गुरुवारी शासनाने केवळ २२३ कोटी रुपये महामंडळाला दिले आहेत. पगाराचे पैसे हवे असतील तर एसटी महामंडळाने आपला जमा-खर्चाचा हिशेब सादर करावा, अशा सूचना अर्थखात्याने महामंडळाला केल्या होत्या. त्यानुसार हे विवरण पत्र महामंडळाने अर्थखात्याला सादरही केले. मात्र, पूर्ण रक्कम देताना सरकारने हात आखडला घेतला आहे. या विवरण पत्रातील माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.
काय आहे विवरण पत्रात...
nविवरण पत्रात एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ अशा नऊ महिन्यांत महामंडळाला ५,१७२ कोटी रुपये उत्पन्न झाले असून १,१४५ कोटी रुपये शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीचे वजा करता ४ हजार २७ कोटी रुपये महामंडळाकडे खर्चासाठी शिल्लक राहिले होते. नऊ महिन्यांत पगारासह इतर बाबींवर महामंडळाचा ७ हजार २५२ कोटी रुपये खर्च झाला असून तब्बल ३ हजार २२८ कोटी रुपयांचा महामंडळाला तोटा झाला आहे.
आज मिळणार वेतन
सरकारने महामंडळाला दिलेला २२३ कोटींचा निधी गुरुवारी उशिरा मिळाल्याने आज, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे.
न्यायालयाने देय तारखेस वेतन करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही वेळेवर वेतन मिळत नव्हते. त्यामुळे संघटनेने फौजदारी अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेऊन तशी नोटीस शासन प्रशासनाला बजावली होती व गुरुवारी दावाही दाखल केला.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना