मुंबई : यंदाच्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाणाऱ्या हज यात्रेकरूंची पहिली तुकडी मुंबईतून एअर इंडियाच्या विशेष विमानाने रविवारी सकाळी रवाना झाली. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासहित इतरांनी यात्रेकरूंचे विमानतळावर स्वागत केले व त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.नक्वी या वेळी म्हणाले की, यंदाची हज यात्रा अनुदानाशिवाय होणारी पहिली यात्रा असल्याने त्याचे मोठे महत्त्व आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. यंदा एक लाख ७५ हजार भारतीय मुस्लीम नागरिक हज यात्रेला जात आहेत. गत दोन वर्षांत हज यात्रेचा कोटा ४० हजारांनी वाढवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला यश आल्याचे नक्वी म्हणाले. जीएसटी कराचा कोणताही बोझा हज यात्रेकरूंवर पडला नसल्याचा दावा त्यांनी केला. किमान खर्चामध्ये यात्रा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुढील वर्षी जलमार्गे हज यात्रेला जाण्यासाठी दोन स्वतंत्र जहाजांची व्यवस्था करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे, हज समितीचे अध्यक्ष खासदार चौधरी मेहबुब अली कैसर, उपाध्यक्ष जीना शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मक्सूद अहमद खान, आमदार आशिष शेलार, सौदी अरेबियाचे उच्चायुक्त साद जफर एस अलगरनी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य एम. एम. शेख, खासदार हुसेन दलवाई, आमदार आरिफ नसीम खान उपस्थित होते. कार्यालय अधीक्षक हशमत परकार यांनी यात्रेकरूंना दुआच्या पुस्तिकेचे वाटप केले.
हज यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना; नक्वी यांनी केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:38 AM