आधी पोलिसांच्या अंगावर दुचाकी चढवली, नंतर लाथ मारून पळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 02:45 AM2020-04-13T02:45:17+5:302020-04-13T02:45:29+5:30
नाकाबंदी दरम्यान त्रिकुटाची मस्ती, बांगुरनगर येथील घटना
मुंबई : नाकाबंदी दरम्यान पंजाब पोलिसांवर झालेल्यां जीवघेण्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतहीपोलिसांवर अशाच प्रकारे हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मास्क आणि हेल्मेट परिधान न करताच दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेल्या त्रिकुटाला नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी अडविणयाचा प्रयत्न केला असता, पोलिसांना ठेंगा दाखवत त्यांच्या अंगावर दुचाकी चढ़वली. तर पाठी बसलेल्या मित्राने पोलिसाला लाथ मारत पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत, त्यांना ओशिवराच्या हद्दितून अटक केली. यात अल्पवयीन चालकासह विजय मोहन यादव (२३), विनोद सिद्धार्थ भालेराव (२१) यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळासह विविध गुन्हे दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मालाड वाहतूक विभागासह बांगुरनगर पोलीस ठण्याकडून गोरेगाव लिंक रोड येथील साठे चौक परिसरात नाकाबंदी करत होते. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तीन इसम गोरेगावकडून ओशिवराकड़े येत असताना दिसले. अशात चालकाने हेल्मेट घातले नव्हते तसेच तिघांनीही मास्क लावले नव्हते. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक राऊत यांनी त्यांना नाकाबंदी मध्ये थांबण्याचा इशारा केला.
अॅक्टीव्हा चालवणाऱ्या इसमाने त्याची अक्टिवा राऊत यांच्या अंगावर घातली. मागे बसलेल्या इसमाने त्यांना लाथ मारली. तसेच पळून जात पाठीमागे बसलेल्या दोघांनी हाताने ठेंगा दाखवत शिवीगाळ करत ओशिवराच्या दिशेने पळ काढला. राऊत यांना ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बांगुर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस सपोनि गुंजकर उपनिरीक्षक शिंदे मालाड वाहतूक विभागाचे रायडर सावंत व पो. शि. उमराणी यांनी त्रिकुटाचा पाठलाग करत त्यांना पकडले़
राज्यभरात १७२ गुन्हे
राज्यभरात पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी १७२ गुन्हे दाखल झाले असून, १६१ जणांना अटक करण्यात आली आहे. २२ मार्च ते १२ एप्रिलच्या पहाटे चार वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.