मुंबई : मुंबई महापालिका नागरिकांना सेवासुविधा देण्यात आघाडीवर असली तरी आजही येथील लोकसंख्येला पुरेशी शौचालये नाहीत. परिणामी अपुऱ्या आणि दुर्गंधीयुक्त शौचालयांचे प्रमाण वाढतच असून, पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे रोगराईचे प्रमाणही वाढत आहे. यावर सारासार विचार करत महापालिकेने आता ‘बायोडायजेस्टर’ या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक पद्धतीवर आधारित सार्वजनिक शौचालयांना प्राधान्य दिले आहे. आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ या अंतर्गत महापालिकेने धारावी व ‘शीव-माहीम लिंक रोड’ येथे ‘बायोडायजेस्टर’ शौचालये बांधली असून, शौचालयातील विष्ठेचे जीवाणूंमुळे ७२ तासांत विघटन होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.महापालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, ‘जी/उत्तर’ विभागाद्वारे बायोडायजेस्टर या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक पद्धतीवर आधारित दोन सार्वजनिक शौचालयांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. या दोन्ही शौचालयांची एकत्रित क्षमता ३० आसनांची आहे. धारावी येथील पिवळा बंगला व सायन-माहीम लिंक रोड हे सागर तटीय नियमन क्षेत्र असल्याने तसेच या ठिकाणी मलनि:सारण वाहिनी नसल्याने अत्याधुनिक पद्धतीचे बायोडायजेस्टर शौचालय उभारण्यात आले आहे. शौचालयाची सेप्टीक टँक ही ‘एफ.आर.पी.’पासून बनविण्यात आली असून, टँकमध्ये जीवाणू (बॅक्टेरिया) सोडण्यात येतात. या जीवाणूंकडून ७२ तासांत टँकमधील मैला नष्ट करून बाहेर फक्त पाणी सोडण्यात येते. हे पाणी दुर्गंधीयुक्त नसून पाण्याचा वापर बागेसाठी करण्यात येणार आहे. पुरुष, महिला व अपंगांकरिता पिवळा बंगला, धारावी येथे १६ आसने व सायन-माहीम लिंक रोड, धारावी येथे १४ आसनी शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)जास्त आसन क्षमतेचे पहिले शौचालयच्बायोडायजेस्टर पद्धतीवर आधारित एवढ्या जास्त आसन क्षमतेचे हे मुंबईतील पहिलेच शौचालय आहे. ‘स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रात नागरिकांकरिता योग्य प्रमाणात शौचालयांची उपलब्धता करून देण्यासाठी महापालिका कार्यरत आहे.च्महापालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाद्वारे धारावी परिसरात आणि ‘शीव-माहीम लिंक रोड’वर पर्यावरणपूरक पद्धतीच्या दोन बायोडायजेस्टर शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. या शौचालयांचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. या शौचालयांची निर्मिती जनजागृती सामाजिक संस्थेद्वारे करण्यात आली आहे.
पहिले ‘बायोडायजेस्टर’ शौचालय
By admin | Published: October 07, 2016 6:07 AM