कांदिवली : कांदिवली पूर्वेकडील आगीत भस्मसात झालेल्या दामूनगर भीमनगर परिसरातील पीडितांना मुंबई महानगरपालिकेने मोठा दिलासा दिला आहे. पालिकेच्या आर/दक्षिण विभागाने स्थानिकांच्या सुविधांसाठी मुंबईतील पहिले जैविक शौचालय बसविले आहे. अशासकीय सेवा संस्थेच्या मदतीने पालिकेने गुरुवारी दोन शौचालयांची व्यवस्था केली.पालिकेच्या या उपक्रमामुळे स्थानिकांनी विशेषत: महिला वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी म्हणजे ७ डिसेंबरला लागलेल्या आगीत येथील हजारो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यानंतर पालिकेसोबतच अनेक सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती पीडितांच्या मदतीसाठी धावून आल्या होत्या. स्थानिकांना राहण्यासाठी पालिकेने प्रथम तंबूची व्यवस्था केली होती; मात्र दुर्घटनेच्या आठवड्याभरानंतर पुन्हा संसार थाटलेल्या पीडितांमध्ये खासकरून महिला वर्गाला शौचासाठी डोंगर भागात उघड्यावर जावे लागत होते. पालिकेने स्थानिकांसाठी सुमारे १२ शौचालये आणि ५ युनिटे फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली होती. मात्र सार्वजनिक शौचालय अर्धा किलोमीटर दूर असल्याने महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. महिला वर्गाची हीच अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने आता २ जैविक शौचालयांची व्यवस्था केली आहे. सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड, दुय्यम अभियंता परिरक्षण जयंत वालवटकर, सहायक अभियंता परिरक्षण वि.च. तीऱ्हेकर या अधिकाऱ्यांनी कमलेश मित्र मंडळ या संस्थेच्या मदतीने या शौचालयांची व्यवस्था केली आहे.कसे असणार जैविक शौचालय?५ बाय ५च्या या शौचालयात मलकुंड (सेप्टिक टाकी) बांधण्याची गरज नाही. शौचालयाच्या भांड्याखाली असलेल्या ३ फुटांच्या टाकीत मल जमा होतो. त्यात बॅक्टेरिया सोडण्यात येतात. परिणामी, मलाचे पूर्णत: विघटन होऊन निर्माण झालेले पाणी बाजूला व झाडांना सोडले जाते; तर निर्माण झालेला वायू बाहेरील पाइपमधून वरच्या दिशेने सोडला जातो.सार्वजनिक शौचालय दूर असल्याने व फिरते शौचालय डोंगराळ व अडचणीचा भाग असल्याने पुरवण्यात पालिकेला अडचणी येत होत्या. म्हणून नव्याने जैविक शौचालय बसविण्याचा मुंबईतील पहिलाच प्रयोग केला आहे. याला लोकांचे सहकार्य मिळाले, तर प्रत्येक विभागात राबवण्याचा पालिकेचा मानस आहे. - साहेबराव गायकवाड, सहायक पालिका आयुक्त
पहिले जैविक शौचालय कांदिवलीत
By admin | Published: January 01, 2016 2:31 AM