Join us  

पहिले अंध गोविंदा पथक रचणार थरावर थर

By admin | Published: August 08, 2015 2:02 AM

‘आम्ही येतोय...’ अशा दवंड्या पिटत यंदाची हंडी फोडण्यासाठी नयन फाउंडेशनचे अंध गोविंदा पथक सज्ज झाले आहे. महाराष्ट्रातील हे पहिले अंध गोविंदा

महेश चेमटे,मुंबई‘आम्ही येतोय...’ अशा दवंड्या पिटत यंदाची हंडी फोडण्यासाठी नयन फाउंडेशनचे अंध गोविंदा पथक सज्ज झाले आहे. महाराष्ट्रातील हे पहिले अंध गोविंदा पथक असून, या पथकाचे गोविंदा आजपासून (शनिवार) सरावाला सुरुवात करणार आहेत. अंशत: दृष्टी असणाऱ्या या गोविंदा पथकाने पाच थर रचण्याचा मानस व्यक्त केला आहे.नयन फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि रामनारायण रुईया महाविद्यालयातील ब्लार्इंड सेलच्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी याचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर सुरू झालेली पथकाची घोडदौड आजही सुरू असून, पथकात ठाणे, घाटकोपर, माटुंगा, वडाळ्यातील दृष्टिहिन तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषत: योगाचे धडे देणाऱ्या अंध मुलांचाही पथकात समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीमध्ये हे गोविंदा पथक माटुंग्यातील दडकर मैदानात सराव करत आहे. पथकाला दादरचे नंदू धनावडे आणि प्रसाद गायकवाड हे प्रशिक्षण देत आहेत. शिट्टीच्या आवाजात एकामागोमाग उभे राहत शिस्तबद्धरीत्या थर रचण्यात आल्यानंतर त्याच वेगाने तोल सांभाळत हे गोविंदा वेगाने सराव करत आहेत.पहिल्या वर्षी चार थर रचत अंध गोविंदांनी विजयी सलामी दिली होती. त्यामुळे या वर्षी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. गेल्या वर्षी मुंबईत दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून पथकाने ६० ते ७० हजार रुपयांची कमाई केली. या कमाईचा वापर फाउंडेशन अंध मुलांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनासाठी करते. यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा, मराठी भाषा दिन, रक्तदान शिबिर, गड-किल्ल्यांचे भ्रमण यांचा समावेश आहे, असे फाउंडेशनचे खजिनदार संकेत पाटील यांनी सांगितले.